अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात ललित पाटीलसह आठ आरोपी पोलिस कोठडीत होते. त्यांची कोठडी शुक्रवारी संपल्याने त्यांना दुपारी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. अरविंद लोहारे याने हा कट रचला आहे. आणखी काही जणांचा या कटात सहभाग आहे का, याचा तपास करायचा आहे. तसेच, तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत, त्याबाबतही अधिक तपास करायचा आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तर, आरोपींना त्रास देण्याच्या हेतूने पोलिस सातत्याने कोठडी वाढवत आहेत. कोठडीची मागणी करताना पोलिस मांडत असलेल्या मुद्द्यात काहीही नवीन नाही. तसेच, काही नवीन गोष्ट मिळालेली नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी चार आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
‘सीडीआर’मधून महत्त्वाची माहिती
हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे, इब्राहम शेख यांच्या ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स) मधून महत्वाची माहिती मिळाली आहे. मात्र, ते तपासाला सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांची कोठडी वाढवून हवी आहे, असे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या तिघांचे बँक ‘डिटेल्स’ मिळाले आहेत. त्याचाही तपास बाकी आहे. तसेच, इब्राहम शेख हा नागपूर येथील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात फरार होता, त्याचाही तपास करणे बाकी आहे, असे पोलिसांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News