Thane Bus: ठाण्याच्या टीएमटी बस सेवेचा लाभ दररोज तब्बल अडीच लाख प्रवासी घेतात. घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, वर्तक नगर, कळव्यापर्यंत जाणारे नागरिक दररोज प्रवास करतात. तरीही बस अपुऱ्या आहेत.
अडीच लाख प्रवासी
स्वराज्य राज्यातील शहरी भागांतील नागरिकांसाठी स्थानिक संस्थांकडून परिवहन उपक्रमांद्वारे सार्वजनिक बससेवा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, व्यवस्थापनातील तांत्रिक अडचणी आणि आर्थिक मर्यादांमुळे या सेवा अनेक ठिकाणी अपुऱ्या ठरत आहेत. मुंबई महानगर प्रदेशात लोकसंख्या जास्त असल्याने सार्वजनिक वाहतुकीची गरजही मोठ्या प्रमाणात भासते. प्रवाशांच्या तुलनेत अपुऱ्या बस, मार्गांवर तुरळक फेऱ्या आणि दिवसेंदिवस वाढणारा तोटा यामुळे ठाणे महानगरपालिकेचा परिवहन उपक्रम अडचणीत असला, तरी या उपक्रमातून गतवर्षी दररोज सुमारे अडीच लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे.
ST Bus: ऐन उन्हाळ्यात एसटी प्रवाशांच्या घशाला कोरड, बस स्थानकातील ‘नाथजल’चं स्टॉल बंद; स्वस्त आणि शुद्ध पाण्यासाठी वणवण
ठाणे परिवहन उपक्रमाने २०२४मध्ये दररोज ३०८ बसेसच्या माध्यमातून सरासरी १ लाख ८४ हजार प्रवाशांची वाहतूक केली होती. तर यंदा बसेसची संख्या ३५२पर्यंत वाढली असून त्यातून सुमारे २ लाख ४४ हजार प्रवाशांनी दररोज प्रवास केल्याचे समोर आले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत बसेसची संख्या अत्यंत अपुरी असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असल्याने शहरातील बससेवेची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
बसची संख्या वाढवण्याची मागणी
ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटीस येथून सुटणाऱ्या बसेसमधून सर्वाधिक प्रवासी वाहतूक होत असून या बसेस घोडबंदर रोड, वर्तकनगर, लोकमान्य-सावरकरनगर, वागळे इस्टेट आणि कळवा या भागांत धावतात. वाढत्या प्रवाशांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर बसेसची संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. राज्यात बेस्ट आणि पुणे परिवहनानंतर सर्वाधिक प्रवासी वाहतूक करण्याचा मान ‘टीएमटी’ला मिळाला आहे.
Bike Taxi: आता रॅपिडो, ओला, उबरची बाईक सेवा बंद? ‘बाइक टॅक्सी’ कंपन्यांचे परवाने तात्पुरते रद्द; परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा
ठाण्याची टीएमटी तिसऱ्या स्थानी असून नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीकडून दररोज ३१७ बसेसद्वारे सुमारे १ लाख ९३ हजार प्रवाशांची वाहतूक होत आहे. २०२४ मध्ये एनएमएमटीकडून ३६७ बसेसच्या माध्यमातून दररोज २ लाख १ हजार प्रवाशांना सेवा देण्यात आली होती. त्यामुळे या वर्षी प्रवासी आणि बसेसची संख्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. या आकडेवारीवरून मुंबई महानगर प्रदेशात वाढत्या प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतुकीची गरज अधिक तीव्र असल्याचे दिसून येते.
अन्य परिवहन उपक्रमांची स्थिती तोळामासाच
कल्याण-डोंबिवली परिवहनमधून यंदा ६१ फेऱ्यांमधून सुमारे ४२ हजार प्रवाशांना सेवा देण्यात आली. मिरा-भाईंदर परिवहन उपक्रमाच्या बसेसची संख्या ७७वरून ९१ पर्यंत वाढली, तर प्रवासी संख्या ८२ हजारांवरून ८९ हजारांपर्यंत वाढली आहे. यंदा उल्हासनगरमध्ये नव्याने परिवहन सेवा सुरू झाली असून दररोज ७ फेऱ्यांद्वारे सुमारे ५ हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.
