• Mon. Nov 11th, 2024

    मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित; छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही, ते एक…; काँग्रेसचा घणाघाती आरोप

    मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित;  छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही, ते एक…; काँग्रेसचा घणाघाती आरोप

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

    राज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे इतरत्र वळवण्यासाठी मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात नौटंकीचे मंत्रिमंडळ आहे. कुणाला मंत्री ठेवायचे, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मंत्री छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही. ते एक पात्र आहे. कर्ता करविता भाजपच आहे, असा हल्लाही त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

    राज्यात कोण काय बोलते हे काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किडनी, शरीराचे अवयव विकायचे आहे. शेतकऱ्यांच्या भावना सरकारला कळत नाही. महागाई, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असेही पटोले म्हणाले.

    भाजप हा आरक्षण विरोधी पक्ष असल्याचा पुनरुच्चार करून पटोले म्हणाले, गरिबी ही जात असून गरीब व श्रीमंत दोनच जाती ठेवायच्या असे पंतप्रधानाच सांगतात. यावरून आरक्षण संपुष्टात आणण्याची व्यवस्था सुरू झाल्याचे स्पष्ट होते. सरकारने जातनिहाय गणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व जातीच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात.

    राजस्थान, छत्तीसगडमध्ये ४५० रुपयात सिलिंडर देण्याचे आश्वासन भाजपने केली. त्यांची ही बनवाबनवी आहे. महाराष्ट्रात का नाही, येथील जनतेने कोणते पाप केले, असा सवाल नाना पटोले यांनी केला. सरकारकडे जाहिरातीसाठी पैसे आहेत. जनतेचे पैसे लुटायचे आणि स्वत:ची पाठ थोपटायची. उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरीबांना सिलिंडर दिले पण, केरोसिन बंद केले. सरकार नफा कमवण्यासाठी जनतेला लुटण्यासाठी आहे, अशी तोफही त्यांनी डागली.

    विधानसभाध्यक्षांकडे सरकारची उलटतपासणी सुरू झाली आहे. इतिहासात कधी असे घडले नाही. १०५ आमदार निवडून आलेल्या भाजपने सत्तेसाठी खेळखंडोबा केला, अशी टीकाही त्यांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासंदर्भातील शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एक्सवर टाकलेला व्हिडीओ बघितला नसल्याने त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगून पटोले यांनी बोलण्याचे टाळले.

    तो त्यांचा प्रश्न
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही पनौती म्हणत नाही. ते आदरणीय आहेत, त्यांचा सन्मान ठेवणे आमचे काम आहे. पनौती म्हणजे अहंकार, ही व्यवस्था जाण्याची वेळ आली आहे. त्याचा चुकीचा अर्थ घेणे बरोबर नाही. भाजप स्वत:वर घेत असल्यास तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed