• Sat. Sep 21st, 2024

शेवटची आंघोळ घालतानाच संशय, सहा दिवसांनी मृतदेह कबरीबाहेर काढला; अखेर मृत्यूचं गूढ उलगडलं

शेवटची आंघोळ घालतानाच संशय, सहा दिवसांनी मृतदेह कबरीबाहेर काढला; अखेर मृत्यूचं गूढ उलगडलं

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नातेवाइकांनी तरुणाची हत्या करून, त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचा आणि त्यानंतर घाईगडबडीत अंत्यसंस्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या झाल्याची तक्रार या तरुणाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर पाच दिवसांनी मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढण्यात आला आणि तपासाला सुरुवात करण्यात आली. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीमध्ये मृतदेहावर सहा ठिकाणी वार दिसल्याचे समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

सालेह फरहान हिलाबी उर्फ शहजाद (वय १९, रा. नारेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील फरहान सालेह हिलाबी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सालेह मावशीच्या गावाला म्हणजे घनसावंगी येथील देवनगर येथे गेला होता. तेथे चार दिवस राहिल्यानंतर, वासेद याफई या नातेवाइकाने १७ नोव्हेंबर रोजी त्यांना फोन केला आणि सालेहने आत्महत्या केल्याचे सांगितले. या फोनमुळे फरहान यांना धक्का बसला. त्यानंतर आनस मोईद याफई, सालेह मोईद याफई, मोईद याफई यांनी शहजाद याचे पार्थिव नारेगावपर्यंत आणले. आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगून या नातेवाइकांनी गडबड केली आणि पहाटे चार वाजेपर्यंत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर दोन दिवसांनी फरहान यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करून, गुरुवारी गंजे शहिदा कब्रस्तान येथे दफन केलेला मृतदेह कबरीतून बाहेर काढला. मृतदेह कबरीतून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेच्यावेळी तहसीलदार, घनसावंगीचे पोलिस, न्यायवैद्यक विभागाचे पथक; तसेच जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेले. या ठिकाणी प्राथमिक अहवालात मृत युवकावर सहा वार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एकूण अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रक्ताने माखलेले कपडे

शहजाद याच्या मृत्यूबाबत माहिती देत असताना फरहान म्हणाले, ‘माझा तरुण मुलगा माझ्या डोळ्यासमोर गेल्याने मी स्तब्ध झालो होतो. दोन दिवस मला काही समजले नाही. शहजादचे रक्तांनी माखलेले कपडे माझ्यासमोर आणण्यात आले, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी शुद्धीवर आलो आणि घटनाक्रमाचा विचार केला. माझा मुलगा स्वत:ला मारून घेऊच शकत नाही, हा माझा विश्वास आहे. त्याची हत्या करण्यात आली. हा माझा आरोप मी पोलिसांसमोर ठेवला. यानंतर कारवाई सुरू झाली.’
Pune Crime: पुण्यातील त्या मृतदेहाचे गूढ उलगडले; पत्नीविषयी अपशब्द वापरल्याने तरुणाला संपवलं, नेमकं काय घडलं?
आंघोळ घालताना अंगावर दिसले वार

शहजाद याचे मृतदेह नारेगाव येथील घरी आणल्यानंतर, हिलाबी राहत असलेल्या घराच्या चौथ्या मजल्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेहाला आंघोळ घालण्यात आले. आंघोळीची विधी पार पडत युवकाच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी वार होते. छातीवर पाठीवर वार होते, असे सांगण्यात आले.

घनसावंगी पोलिसांत नोंद नाही

सालेह फरहान हिलाबी याने स्वत:च्या अंगावर चाकूने वार करून आत्महत्या केली. ही गोष्ट खरी असती, तर संबंधितांनी थेट घनसावंगी पोलिसांना बोलविले असते. त्यांनी तसे न करता, सालेहचा मृतदेह घरी आणला आणि घाईगडबडीत अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले, असा आरोपही मृत युवकाच्या वडिलांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed