• Sat. Sep 21st, 2024

लोखंडी सळई डोक्यावर पडून ९ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू; पुण्यातील घटना

लोखंडी सळई डोक्यावर पडून ९ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू; पुण्यातील घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गृह प्रकल्पाचे काम सुरू असताना लोखंडी सळई डोक्यात पडून पादचारी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर परिसरात घडली. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रुद्र केतन राऊत (वय ९, रा. श्रीनाथ सोसायटी, वीरभद्रनगर, बाणेर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई पूजा केतन राऊत (वय ३०) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ला कमर्शिअल बांधकाम प्रकल्पाचे संचालक, बांधकाम व्यावसायिक; तसेच अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा राऊत आणि त्यांचा मुलगा रुद्र बुधवारी (२२ नोव्हेंबर) दुपारी पावणे तीनच्या सुमारास शाळेतून घरी जात होते. वीरभद्रनगर परिसरात ला कर्मिशअल बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या वेळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून लोखंडी सळईचा तुकडा रुद्र याच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेत रुद्रची आई पूजा थोडक्यात बचावल्या. रुद्रला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगरात लाख घरांवर टांगती तलवार; गुंठेवारी भागातील अनधिकृत बांधकामांना नोटीस
या घटनेची माहिती समजताच चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची पाहणी केली. तेव्हा तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नसल्याचे आढळून आले. या इमारतीच्या परिसरात जाळी बसविण्यात आली नव्हती. सुरक्षाविषयक उपाययोजना न करता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत.

महापालिकेची विकासकावर कारवाई

दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यामध्ये बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्याचे व बांधकामाच्या अटींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने संबंधित विकासक व वास्तूविशारदाला बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली आहे. सर्व बांधकाम व्यावसायिकांनाही सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही पालिकेने दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed