मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण सुभाष पाटील (३० रा. बिलवाडी, ता. जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. या तरुणाने आता नुकतीच ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्याचा पराभव झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील सार्वे येथे ३ दिवसांपूर्वी दिवसा चोरी झाली होती. या संदर्भात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता. वावदडा येथे खून प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील यांना घरफोडी करणाऱ्या संशयिताचे धागेदोरे मिळाले होते.
ही चोरी बिलवाडी गावातील प्रवीण पाटील यानेच केल्याचे पक्की मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश राजपूत, गणेश वाघमारे, गणेश चौबे, विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, संदीप साळवे, विजय पाटील, किरण चौधरी, सचिन महाजन, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील यांचे पथक कामाला लागले. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी प्रवीण सुभाष पाटील याला त्याच्या गावातून मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अटक केली. त्याने सुरुवातीला आपण चोरी केले नसल्याचे सांगितले.
त्यानंतर खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. गेल्या दोन वर्षात त्याने आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात जाऊन दिवसाढवळ्या चोरीचे २० गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याच्याकडून १७३ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, १० लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, ९० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी असा एकूण २० लाख २९ हजार रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीवेळी जळगाव तालुक्यातील बिलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी प्रवीण पाटील याने स्वत:चे पॅनल तयार केले होते. प्रवीण पाटील याने याच ग्रामपंचायत निवडणुकीवेळी सरपंचपदासाठी उमेदवारी केली होती. सरपंच पदाच्या विजयी उमेदवारांना ४३२ मते मिळाले तर दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला ४१८ मते मिळाली. पाटील याला १९४ मते मिळाली होती. त्यामुळे त्याला या निवडणुकीत पराभर पत्करावा लागला. घरची परिस्थिती हलाखीची असताना अल्पावधीच त्याने जी प्रगती केली, त्यावरुन तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
गेल्या काही वर्षापासून तो घरफोडी आणि इतर गुन्हे करत होता. धुळे जिल्ह्यात त्याची गँगच तयार झालेली होती. ही गँग ठिकठिकाणी घरफोड्या आणि चोऱ्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता त्याने २० घरफोड्यांची कबुली दिली आहे. पथकाकडून त्याची अजून चौकशी केली जात असून त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही दिवसांपूर्वी सरपंचपदासाठी प्रयत्न करत असताना काही दिवसातच घरफोड्यांचा प्रपंच समोर आल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.