• Sat. Sep 21st, 2024
यात्रेत तमाशाचा फड उभारत होते; तेवढ्यात अनर्थ घडला अन् कलावंत जीवानिशी गेले, मंडळात हळहळ

बुलढाणा: जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी गावात कान्हू सती मातेची यात्रा भरली आहे. ही यात्रा दोन दिवसाची असून आज ही यात्रा सुरु झाली. यात्रेत तमाशाचे फड आयोजित करण्यात आले होते. आज २२ नोव्हेंबर रोजी तमाशाचे फड उभारणे सुरू असतानाच मोठी दुर्घटना घडली.

जळगाव येथील आनंद लोकनाट्य मंडळातील कलावंत तमाशाचा फड उभा करत असताना हातातील लोखंडी पाईपचा विद्युत तारेला संपर्क झाला. यामध्ये शॉक लागून कलावंत अंकुश भारुडे, विशाल भोसले या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यामधील मृतक अंकुश भारुडे हे मुळचे नारायणगाव जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे. तर विशाल भोसले हे राजुर गणपती येथे राहतात. दोघेही आनंद लोकनाट्य मंडळाचे कलावंत तथा कर्मचारी आहेत. यात्रेनिमित्त गावोगावी, तसेच आयोजित ठिकाणी तमाशाचे फड उभारण्याचे काम ते मागील कित्येक वर्षांपासून करत आहेत. परंतु मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथे मोठ्या दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला.
वारंवार घरफोडीच्या घटना; पोलीस मागावर, एक चूक करुन बसला अन् सरपंचपदासाठी उभा राहिलेला चोर जाळ्यात अडकला
दरम्यान घटनास्थळी धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दोघांचेही मृतदेह बुलढाणातील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. ही दुर्देवी घटना डोळ्यासमोर पहाल्याने अनेकांची घबराट झाली होती. मंडळातील अनेकांना अश्रू अनावर झाले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातही मृतकांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. सिद्धार्थ गरबडे नजीक पांग्री, बदनापूर, जि. जालना याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांनी यावेळी या कुटुंबांना सावरण्याचा प्रयत्न केला.

पान्हेरा खेडी येथील सती कान्हू माता यांची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. २२ नोव्हेंबर पासून या यात्रेस प्रारंभ झाला. दरम्यान या यात्रेमध्ये जळगाव येथील आनंद लोकनाट्य तमाशामंडळ आले होते. या तमाशाच्या तंबूची उभारणी करण्याचे काम सुरू होते. यावेळी मालवाहू वाहनातून साहित्य खाली उतरवत असतांना वीज प्रवाह असलेल्या तारांना एकाच्या हातातील पाईपचा स्पर्श झाल्याने त्याच्यासह वाहनाजवळ काम करत असलेल्या दोघांना वीजेचा धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

अयोध्या पौळ यांनी चष्म्यावर कमेंट केली, मुंडे समर्थक तुटून पडले

दरम्यान त्यांना प्रथम धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि तेथून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी यातील दोघांना मृत घोषित केले. तिसरा जखमी राहूल शंकर जाधव (२०, रा. घनसोली, मुंबई) याच्यावरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वाहनातील साहित्य काढत असतांना एकाच्या हातातील पाईपचा स्पर्श वीज प्रवाह असलेल्या तारांना झाला आणि त्यातून ही दुर्घटना घडली. मृतांपैकी एक जण साऊंड ऑपरेटर असून एक जण मजूर होता. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed