• Sat. Sep 21st, 2024

विकसित भारत संकल्प यात्रेच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी चांगले नियोजन करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

ByMH LIVE NEWS

Nov 22, 2023
विकसित भारत संकल्प यात्रेच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी चांगले नियोजन करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संपूर्ण देशासह जिल्ह्यात १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी ही यात्रा यशस्वी करण्यासाठी चांगले नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. मुश्रीफ यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात योजनांच्या व मोहिमेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या ९ चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवून रथ मार्गस्थ करण्यात आले.  जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायत क्षेत्रांमधे चित्ररथांद्वारे जनजागृती अभियान राबवून योजनांचे महत्त्व लाभार्थ्यांना पटवून दिले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने,  प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तथा नोडल अधिकारी ग्रामीण अरूण जाधव, संजय पाटील यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील १०२५ ग्रामपंचायतींमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. या यात्रेमार्फत ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या मोहीम राबविण्यात येणार आहे. या यात्रेसाठी शासनाकडून सुसज्ज असे चित्ररथ जिल्ह्यात आले असून त्यांच्यामार्फत सर्व तालुक्यात तसेच पुढे नागरी क्षेत्रात केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी केली जाणार आहे.

ही यात्रा पुढील टप्प्यात नगरपालिका, महानगरपालिकेच्या क्षेत्रात जाणार असल्याने या यात्रेचे दरदिवसाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. या यात्रेत भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य ती कार्यवाही यंत्रणेने करावी, या यात्रेसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मनुष्यबळ, वाहनव्यवस्था, यात्रेच्या जाण्या-येण्याचे मार्ग, स्थळांची माहिती इत्यादींची केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, स्तरावर समन्वय समिती गठीत करण्याच्या व प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या तसेच प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणारे चित्ररथ दिवसाला १८ गावे पूर्ण करून येत्या दोन महिन्यात संपूर्ण १०२५ ग्रामपंचायती पूर्ण करणार असल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

गाव पातळीवरती अभियान राबवित असताना विविध कुटुंबांकडून योजनेचे लाभ मिळाले किंवा नाही याबाबतचीही माहिती एकत्रित केली जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात आयुष्यमान भारत, पंतप्रधान आवास योजना, पीएम उज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम किसान सन्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड, पीएम पोषण अभियान, हर घर जल जीवन मिशन, स्वामित्व योजना, जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम, नॅनो फर्टिलायझर, पीएम गरीब कल्याण योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना यांचा समावेश असणार आहे.

तर पुढील टप्प्यात शहरी भागात पीएम स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम उज्वला योजना, पीएम मुद्रा कर्ज योजना, स्टार्टअप इंडिया, आयुष्यमान भारत योजना, स्वच्छ भारत अभियान, पीएम ई बस सेवा, अटल मिशन, पीएम भारतीय जन औषधि योजना, उज्वला योजना, सौभाग्य योजना, डिजिटल पेमेंट इन्फ्रा, खेलो इंडिया, उडान, वंदे भारत ट्रेन्स अँड अमृत भारत स्टेशन योजना याबाबतची माहिती एकत्रित केली जाणार आहे. तद्नंतर योजना न पोहचलेल्या कुटुंबांना व व्यक्तींना ती दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed