• Mon. Nov 25th, 2024

    देवा, आजची मॅच जिकू दे रे बावा! प्रार्थनास्थळी नागपूरकर क्रिकेट चाहत्यांचे विजयासाठी साकडे

    देवा, आजची मॅच जिकू दे रे बावा! प्रार्थनास्थळी नागपूरकर क्रिकेट चाहत्यांचे विजयासाठी साकडे

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विश्वचषक क्रिकेट सामन्याच्या अंतिम लढतीत भारतच जिंकेल अशा ठाम विश्वासाने नागपूरकर सज्ज झाले. सामना रविवारी असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला. सामन्याच्या पूर्वसंध्येलाच दिवाळीच्या उत्सवात उत्साहाला उधाण आले. भारताने विश्वचषक जिंकावा, यासाठी टेकडी गणेशाला साकडे घालण्यात आले. ताजुद्दिनबाबांच्या दरबारात चादर अर्पण करण्यात आली.

    भारताचा गणवेश असलेले टी-शर्ट्स शनिवारी मोठ्या प्रमाणात विकले गेले. भोंगे, शिट्ट्या यांचीही व्यवस्था केली. सामना कुठे व कसा बघायचा, याचेही बेत शौकिनांनी आखले. शहरातील क्लब्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्सच नव्हे तर शौकिनांनी मित्र परिवारासह घरी व्यवस्था केली आहे. नागपूर चेम्बर ऑफ कॉमर्ससह अनेक संस्थांनी अंतिम सामना एकत्र बघता यावा, यासाठी दिवाळी स्नेहमिलन आयोजित केले. त्यासाठी मोठे स्क्रीन्स लावले. वर्धमाननगर येथील एमएसबी शाळेत मोठा स्क्रीन लावून बोहरा समाजाला निमंत्रण देण्यात आले आहे. सामन्यादरम्यान डीलिव्हरी बॉइजची देखील डोकेदुखी वाढणार आहे. सामन्याच्या निकालानंतर तरुणाई रस्त्यावर येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनीही बंदोबस्तासाठी आवश्यक सूचना केल्या. वेस्ट हायकोर्ट रोड अर्थात लक्ष्मीभुवन चौक हा क्रिकेट शौकिनांचा अड्डा बनला आहे. या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याखेरीज महाल, इतवारी, वर्धमाननगर, सक्करदरा, सदर, काटोल रोड अशा विविध भागात पोलिसांची नजर राहणार आहे.
    क्रिकेटप्रेमी पुणेकर सज्ज; आजच्या भारत vs ऑस्ट्रोलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी
    भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख शरद सरोदे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढली. वैशालीनगर डीएनए ग्राउंड येथील हनुमान मंदिरात पूजन करून महाआरती केली. रॅलीत सोनूसिंग गौर, मुल्लासिंग गौर, छोटू राऊत, गुलशन सुखवानी, बंटी पंडेल, जीवन वर्मा, ऋषी आनंद, विनोद कल्याणी, शंकर वानखेडे, किरण कामडे, बाल्या मोरले, गौरव श्रीवास, संतोष पाठक, अजय मौंदेकर, रवी पाटील, सचिन मोटघरे, संतोष ठाकूर, राज पिपरीकर सहभागी झाले होते.

    काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली ताजुद्दिनबाबांच्या दर्ग्यात चादर चढवण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा तुफान खेळी करेल, विराट कोहली ५१वे शतक करेल आणि मोहम्मद शमीला पाच विकेट्स मिळतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष अल्लाउद्दिन अन्सारी, शफी शेख, दानिश, लतिफ हुसेन, एनएसयूआयचे अध्यक्ष क्षितिज साखरे, मकबूल अन्सारी आदी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *