• Sat. Sep 21st, 2024

पीकविम्यापोटी मिळाले चक्क दोन रुपये, विमा कंपनीविरोधात शेतकऱ्यांतून संताप; नेमकं प्रकरण काय?

पीकविम्यापोटी मिळाले चक्क दोन रुपये, विमा कंपनीविरोधात शेतकऱ्यांतून संताप; नेमकं प्रकरण काय?

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने पीकविमा कंपनीने जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४१ कोटी रुपये जमा केल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर करताच शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त झाला. मात्र, प्रत्यक्ष काही शेतकऱ्यांच्या बँकेत खात्यांत पीकविमा कंपनीने दोन रुपये, तीन रुपये; तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात काहीच रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

राज्यातील पीकविमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात अग्रीम रक्कम देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार, बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानीची अग्रीम रक्कम जमा करणे सुरू केले. जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित ५ लाख २५ हजार ५४१ पीकविमा योजनेच्या ‘स्थानिक आपत्ती जोखिमे’अंतर्गत पूर्वसूचना नोंदविल्या आहेत. या सूचनांचे पंचनामे करून विमा कंपनीने वाटप सुरू केले. त्यानुसार ८ व ९ नोहेंबर रोजी जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४१ कोटी १० लाख रुपये जमा करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मात्र, लाखो रुपये विमा कंपनीने जमा केल्यावरही प्रत्यक्ष बँक खात्यांत रक्कम जमा न झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या.

‘हा ऑस्ट्रेलिया संघ पूर्वीसारखा ताकदीचा नाही’; माजी कर्णधाराने केली भारताच्या जगज्जेतेपदाची भविष्यवाणी
शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर इंगळे यांनी चौकशी सुरू केली. मात्र, त्यांना लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मिळाली नाही. कृषी अधीक्षक कार्यालयातील संबंधित कर्मचारी यादी देत नव्हते. त्यामुळे, शुक्रवारी कृषी अधीक्षक कार्यालयात संतोष ढवळे आणि किशोर इंगळे यांच्यासह कार्यकर्ते धडकले. त्या वेळी कृषी अधीक्षक कार्यालयात नव्हते. मात्र, शिवसैनिकांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीचा आग्रह धरल्यावर संबंधित अधिकाऱ्याने यादी दाखविली असता त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली पीकविम्याची रक्कम बघून त्यांना धक्काच बसला.

वरझडी येथील मनोज लखमाजी राठोड या शेतकऱ्याच्या खात्यात २ रुपये, त्यांचा भाऊ देवानंद लखमाजी राठोड यांच्या खात्यातही दोन रुपये; तसेच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातही दोन रुपये जमा झाल्याचे त्यांना आढळले. यावली येथील शेतकरी मेरसिंग रमण राठोड यांच्या खात्यात तीन रुपये जमा झाल्याचा आरोप संतोष ढवळे यांनी केला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड आणि तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी कार्यालयात नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला.

‘आमचे शेत अडाण नदीच्या काठावर आहे. अतिवृष्टीदरम्यान पूर आल्याने आमचे सर्व पीक वाहून गेले. शेतातील गोठ्यात असलेले खताचे ५० पोते वाहून गेले. माझ्याकडे साडेसहा एकर शेती असून त्यातील पिके वाहून गेली. पीकविमा कंपनीने नुकसानाचे सर्वेक्षण केल्यानंतर आमचे झालेले नुकसान बघता योग्य रक्कम जमा होईल, असे वाटत होते. मात्र, माझ्या खात्यात तीन रुपयांची रक्कम जमा होणे संतापजनक आहे,’ अशी प्रतिक्रिया यावली येथील शेतकरी मेरसिंग चरण राठोड यांनी व्यक्त केली.

टीम इंडियाला मिळाले माऊलीचे आशीर्वाद! मोहम्मद शमीच्या आईने दिलेल्या शुभेच्छा करतील भावुक; पाहा VIDEO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed