• Mon. Nov 25th, 2024

    Pune News: नवऱ्याचा पगार २६८००, पत्नीला महिन्याला १२ हजारांची पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश

    Pune News: नवऱ्याचा पगार २६८००, पत्नीला महिन्याला १२ हजारांची पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पत्नीचे पालक कमवते असले, तरी पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी ही पतीची असते. पत्नीचे माहेर सधन आहे, म्हणून तिची जबाबदारी टाळता येत नाही,’ असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने पत्नीला दरमहा बारा हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

    राज आणि प्रिया (दोन्ही नावे बदलली आहेत) यांचा विवाह झाला होता; परंतु प्रियाला राज व त्याच्या कुटुंबीयांकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यामुळे ती माहेरी राहत होती. तिने कुटुंबीयांविरोधात कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यांतर्गत खटला दाखल करून अंतरिम पोटगीसाठी न्यायालयात अर्ज केला. ‘प्रियाला तिच्या नणंदेने घरातून बाहेर काढले होते. तिला नांदू दिले नाही. परिणामी तिला माहेरी राहावे लागले. ती सासरी असतानाही तिला आई-वडील पैसे पाठवित होते. लग्नाच्या वेळी पती एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. त्याला चाळीस हजार रुपये पगार होता; तसेच चिखली येथे एक सदनिका असून, नारायण पेठेतील मालमत्ता पुनर्विकासासाठी दिली आहे. प्रियाला एका शाळेत योग शिक्षिकेची नोकरी होती; परंतु सासरी होत असलेल्या जाचामुळे तिला नोकरी सोडावी लागली,’ असा युक्तिवाद प्रियाच्या वकील अॅड. नीता भवर यांनी केला.

    राजने या गोष्टी मान्य करण्यास नकार दिला. ‘प्रिया ही माहेरच्या व्यक्तींच्या प्रभावाखाली असते. घरातील ताणतणावामुळे मला पूर्वीची नोकरी सोडावी लागली; परंतु आता दुसऱ्या कंपनीत काम करीत असलो, तरी तिथे फक्त २६ हजार ८०० रुपये पगार आहे. माझ्यावर आई-वडिलांची जबाबदारी आहे; तसेच घराचे कर्जही आहे. प्रिया चांगली शिकलेली आहे, ती योग शिक्षिका म्हणून काम करू शकते. तिचे पालकही कमवते आहेत. त्यामुळे अंतरिम पोटगीचा अर्ज फेटाळण्यात यावा,’ अशी मागणी राजने केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर पत्नीला अंतरिम पोटगीचा दिलासा दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *