• Mon. Nov 25th, 2024
    बेबी व्हेल पुन्हा आला गणपतीपुळे किनाऱ्यावर, वाचण्याची शक्यता कमी

    चिपळूण : गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या ‘बेबी व्हेल’ माशाला वाचवून मंगळवारी रात्री उशिरा सव्वा अकराच्या सुमारास पुन्हा खोल समुद्रात सोडण्यात आले होते. पण हा मासा बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर आला. या माशाची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती गणपतीपुळे येथील स्थानिक नागरिकांनी दिली. सोमवारी सकाळी हा मासा समुद्रकिनाऱ्यावर आला होता. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

    गणपतीपुळे येथील स्थानिक युवक, जिंदाल, कोस्ट गार्ड व मत्स्य विभागाच्या बोटी या माशाला वाचवण्यासाठी दाखल झाल्या. वनविभागाच्या गिरीजा देसाई व राजश्री कीर आदी प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा या माशावर उपचार करण्यासाठी पुणे येथून डॉ. चेतन हेही दाखल झाले होते. या माशाला सलाइन लावून प्रतिजैविकांची मात्रा देऊन त्यानंतर त्याला पुन्हा मंगळवारी रात्री उशिरा पाण्यात सुमारे चार ते पाच किलोमीटर आत सोडण्यात आले होते. सुमारे ४० तासांपेक्षा अधिक काळ हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर वनविभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, पोलिस आदी सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. मात्र हे रेस्क्यू ऑपरेशन तूर्तास अयशस्वी ठरले आहे. कोकणात सध्या दिवाळीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी आहे. या माशाला पाहण्यासाठी तसेच त्याचे सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

    वाचण्याची शक्यता कमी

    अशा प्रकारचा मोठा मासा जेव्हा समुद्रकिनारी येतो तेव्हा त्याची संवेदना कमी झालेली असते किंवा कोणत्याही स्वरूपाचे दूषित पाणी त्याच्या डोळ्यांना लागल्यास त्याच्या दृष्टीवर परिणाम होतो तसेच समुद्रातील कीटकांमुळे या माशाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे अशक्त असलेला मासा किनाऱ्याकडे येतो आणि त्यानंतर त्याची वाचण्याची शक्यता कमी असते, असे येथील स्थानिक मत्स्य व्यावसायिक व या क्षेत्रातील जाणकार मच्छिमार बांधवांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *