• Mon. Nov 25th, 2024
    नोव्हेंबरच्या मध्यातही ऑक्टोबर हिट, कमाल तापमान ३६ अंशांवर, थंडीसाठी महिनाभर वेटिंग

    मुंबई : नोव्हेंबरचा मध्य आला तरी ऑक्टोबर हिटची जाणीव मुंबईतून कमी झालेली नाही. सातत्याने उष्म्याचा ताप मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंशांच्या पुढे होते. या उष्म्यापासून सध्या तरी दिलासा मिळेल अशी शक्यता नाही. मुंबई आणि कोकण भागात थंडीची चाहूल डिसेंबरच्या मध्यानंतर लागू शकेल, असा अंदाज आहे.

    सांताक्रूझ येथे सोमवारी ३६.६ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. रविवारीही सांताक्रूझ येथे ३६.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. सोमवारी मुंबईचे किमान तापमानही चढेच होते. कुलाबा येथे २५.८ तर सांताक्रूझ येथे २३.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान कुलाबा येथे २.६ अंशांनी, तर सांताक्रूझ येथे २.१ अंशांनी सरासरीहून अधिक होते.

    ‘सध्या ईशान्य मौसमी वाऱ्यांचा ऋतू आहे. त्यामुळे राज्यातही पूर्व ते ईशान्य भागातून वारे वाहत आहेत. परिणामी किनारपट्टीवरील वातावरण तापलेले आहे. या आठवडाअखेरपर्यंत मुंबईचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे’, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी दिली.

    १६ नोव्हेंबरला पश्चिमेकडून वारे येऊ शकतात, मात्र हा दिलासा फार काळ टिकणार नाही. १९ आणि २० नोव्हेंबरला पुन्हा थोडे ढगाळ वातावरण झाले तर कमाल तापमान थोडे उतरू शकेल. पण हे तापमान फार खाली जाण्याची शक्यता नाही. सध्या आभाळही निरभ्र असल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचून वातावरणात उष्म्याची जाणीव अधिक होत आहे.

    भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढेही नोंदला गेला आहे. सन २०१८ मध्ये ३७.६ सन २०१४ मध्ये ३७ तर सन २०११ मध्ये ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची सांताक्रूझ येथे नोंद झाली होती. सोमवारी केवळ मुंबईत नाही तर अलिबाग, रत्नागिरी येथेही कमाल तापमान ३५.८ असे चढे होते. हे तापमान सरासरीपेक्षा २ अंशांहून अधिक होते.

    थंडीची चाहूल डिसेंबर मध्यानंतरच

    सध्या कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात ३१ ते ३३ अंशांदरम्यान कमाल तापमान असू शकेल, तर उत्तर महाराष्ट्रात १६ ते १८ अंशांदरम्यान किमान तापमान असू शकते; पण हा दिलासा दीर्घ काळ मिळण्याची शक्यता सध्या नाही. ईशान्य मान्सून डिसेंबरमध्ये परतल्यानंतर मग उत्तरेकडून वारे वाहायला सुरुवात होईल. राज्यात त्यानंतरच थंडीचा ऋतू जाणवू शकेल.

    दिवाळीच्या फटाक्यांमध्येही क्रिकेट वर्ल्डकप फिव्हर! बाजारात बॅट आणि बॉलचे फटाके

    Read Latest Mumbai Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed