पुणे येथे दरवर्षी राज्यातील ७५० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण
राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. ‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या ‘सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमालेचा हा दुसरा भाग…
‘सारथी’मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात ‘यूपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेसाठीही मोफत प्रशिक्षणाची योजना राबविली जाते. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील लक्षीत गटातील उमेदवारांना राज्य सेवेतील विविध प्रशासकीय पदांवर काम करण्याची संधी मिळावी, हा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे. गेल्या तीन वर्षात म्हणजेच 2020 पासून या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेले 304 उमेदवार राज्य शासनाच्या सेवेत अधिकारी म्हणून दाखल झाले आहेत. सुरुवातीला दरवर्षी 250 उमेदवारांना या परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येत होते, गतवर्षी या सख्येत वाढ करण्यात आली असून आता दरवर्षी 750 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेतलेल्या 70 उमेदवारांचा सन 2020 मध्ये राज्य सेवा परीक्षेच्या अंतिम निवड यादीत समावेश होता. यापैकी पहिल्या पाच जणांमध्ये ‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेतलेले चार उमेदवार होते. तर 2021 मध्ये ‘सारथी’च्या योजनेतून प्रशिक्षण घेतलेले 104 उमेदवार अंतिम निवड यादीत होते. त्यामध्ये 5 उपजिल्हाधिकारी, 6 पोलीस उपअधीक्षक, 5 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पदावर रुजू झाले. तांत्रिक सेवेमध्ये कृषि सेवेसाठी 67, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 35, यांत्रिकी अभियांत्रिकीसाठी 16 आणि वन सेवेसाठी 10 उमेदवारांची निवड झाली. गेल्या तीन वर्षात 74 उमेदवार वर्ग-1 चे अधिकारी, तर 230 उमेदवार वर्ग-2 चे अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.
मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाती कोणत्याही शाखेतील पदवीधारक, तसेच एमपीएससी राज्य सेवा परीक्षा देण्यासाठी पात्र उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ‘सारथी’मार्फत किंवा इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांकडून राबविण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा उमेदवाराने लाभ घेतलेला नसावा.
एमपीएससी राज्य सेवा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सारथी’ने पुणे येथील संस्थांची निवड केली आहे. चाळणी परीक्षेद्वारे राज्यातील दरवर्षी विद्यार्थ्यांची निवड या प्रशिक्षणासाठी केली जाते. या उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यासाठी प्रशिक्षणाचे देण्यात येते. पूर्व परीक्षा प्रशिक्षणाचा कालावधी अंदाजे 8 महिन्यांचा आहे. मुख्य परीक्षा कालावधी सुमारे 3 महिने आणि मुलाखत तथा व्यक्तिमत्व चाचणी प्रशिक्षणाचा कालावधी अंदाजे एक महिन्याचा असतो.
प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांना पुस्तके आणि इतर आकस्मिक खर्चासाठी एकरकमी 10 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. पूर्व परीक्षा प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या वर्गातील उपस्थिती व चाचणी गुणानुसार दरमहा मासिक 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. पूर्व-परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी नि:शुल्क कोचिंगसोबतच वर्गातील मासिक हजेरी आणि चाचणी गुणांनुसार 15 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी ‘सारथी’च्या संचालक मंडळाने निश्चित केलेली रक्कम अर्थसहाय्य म्हणून दिली जाते.
एमपीएससी परीक्षा प्रशिक्षण योजनेच्या प्रमुख अटी
उमेदवार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला तथा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराच्या नावाचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले नॉन-क्रिमीलेअर, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा ईडब्लूएस प्रमाणपत्र आवश्यक आहे.
‘सारथी’च्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जातात. अर्जदाराची निवड ‘सारथी’मार्फत आयोजित ‘सीईटी’मध्ये प्राप्त गुणांद्वारे केली जाते. या गुणांकानुसार गुणवत्ता यादी ‘सारथी’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीद्वारे पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्ण केली जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला किंवा शाळेचा दाखला किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र अथवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पदवी प्रमाणपत्र, दहावी बोर्डचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, आधार कार्ड, पॅनकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज फोटो.
प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची संधी
सन 2023-24 मध्ये ‘सारथी’च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
- तानाजी घोलप, माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर
*****