सुटीच्या दिवशी; तसेच उन्हाळी आणि दिवाळीच्या सुटीत प्राणी संग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी असते. तिकिटांसाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे पालिकेने संग्रहालयाची तिकिटे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची करण्याची मागणी होत होती. त्यानुसार या ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधेचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते नुकतेच झाले. उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
कात्रज येथील या संग्रहालयाला गेल्या वर्षी सुमारे २२ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. ही संख्या दर वर्षी वाढत आहे. यामुळे पर्यटकांना संग्रहालयाविषयी माहिती मिळावी, या हेतूने महापालिकेने प्राणी संग्रहालयाची वेबसाइट विकसित केली आहे. त्यातच ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नेट बँकिंग, कार्ड पेमेंट अथवा यूपीआय प्रणालीद्वारे पैसे भरता येणार आहेत.
नवे प्राणी भेटीला
महापालिकेकडून १४ मार्च १९९९मध्ये पेशवे पार्क येथील अवघ्या सात एकर जागेतील प्राणी संग्रहालय कात्रज येथील सुमारे १३० एकर विस्तारित जागेत स्थलांतरित केले. यामध्ये ६० प्रजातींचे ४३० प्राणी आहेत. २०२२-२३मध्ये प्रशासनाने वाघाटी, रानमांजर, शेकरू आणि गवा जोडी केरळमधून आणण्यात आली. या वर्षी पांढरा वाघ, तरस, चौशिंगा उपलब्ध करून देण्यात आला असून, लवकरच झेब्रा, पिसोरी हरण, लायन टेल्ड मकॉक (दक्षिणेतील माकड) आणण्यात येणार आहे. दहा टक्के परदेशी प्राजातींचे प्राणी ठेवण्याचे बंधन शिथील करून २५ टक्के करण्यात आले आहे. प्राणी प्रजातींची संख्या दीडशेपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
असे मिळेल ऑनलाइन तिकीट
महापालिकेने कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासाठी https://punezoo.in ही वेबसाइट सुरू केली आहे. यावर प्राणी संग्रहालयाच्या माहितीसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा आहे. पर्यटकांना या वेबसाइटवरील ऑनलाइन तिकीट या लिंकवर जाऊन आपली माहिती, तिकिटांची संख्या, मोबाइल क्रमांक; तसेच इतर आवश्यक माहिती भरल्यानंतर त्यांना ऑनलाइन तिकीट बुक करता येईल.