मिळालेल्या माहितीनुसार, मनोज बळीराम जाधव (४०, रा. आसुद तेलीवाडी ता. दापोली जि.रत्नागिरी) या शेतकरी कुटुंबातील तरुणाने आजारपणाला कंटाळूनच कोणीही घरात नसल्याचे पाहून विषारी कीटकनाशक प्राशन केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. ऐन दीपोत्सवाच्या मुहूर्तावरच आसूद तेलीवाडी येथे राहणाऱ्या जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज जाधव हा शेतकरी कुटुंबातील विवाहित तरुण होता. तो उत्कृष्ट मेकॅनिकही होता. टेम्पो दुरुस्त करणे ही त्याची खासियत होती.
दरम्यान २९ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. याच सुमारास घरातील पत्नी आणि मुले शेतात कामासाठी गेले होते. त्यावेळी घरी कोणी नसताना किटकनाशक औषध प्राशन केले. काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागले या घटनेची माहिती शेजारी तसेच कुटुंबाला मिळताच त्याला तात्काळ दापोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अधिक उपचारांसाठी तात्काळ हलवण्यात आले होते.
येथे त्याच्यावरती उपचार सुरू होते. वालावलकर रुग्णालय डेरवण येथे उपचार सुरू असतानाच त्याचा १० नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. मनोज बळीराम जाधव याच्या पश्चात त्याची पत्नी, दोन लहान मुले, भाऊ ,भावजय असा परिवार आहे. टेम्पो मेकॅनिक असलेला मनोज बळीराम जाधव हा मदतशील स्वभावाचा म्हणून परिसरात सगळ्यांना परिचित होता. त्याला गेले काही दिवस किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला होता.
याच आजारपणाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जाधव कुटुंबातील कर्ता पुरुषच ऐन दिवाळीत सोडून गेल्याने जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जाणत्या वयातच या लहान मुलांच्या वाट्यालाही हे मोठे दुःख आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आसूद परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.