मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर बारा दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सर्व वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर जरांगे यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. जरांगे रुग्णालयातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औंक्षण करीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ‘अंतरवालीला निघालो असलो तरी माझ्या घरी जाणार नाही आणि दिवाळी साजरी करणार नाही. आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केली. या दु:खाचे सावट असताना दिवाळी कशी साजरी करणार ? ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेलो तेव्हा अत्यंत वाईट वाटले’, असे जरांगे यांनी सांगितले.
येत्या २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नये, असे आवाहन त्यांनी केले. येत्या १५ ते २३ नोव्हेंबर दरम्यान जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्रात गाठीभेटीचा दौरा आहे. तसेच पुढील दौरा हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत विदर्भात होणार आहे. विदर्भातून आमंत्रण आल्यामुळे गाठीभेटीसाठी जात आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्नच नाही’, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी शनिवारी रात्री नऊ वाजता देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील सोनवणे कुटुंबियांची भेट घेतली. या कुटुंबातील सुनील सोनवणे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. कोलठाण येथील शुभम गाडेकर, कुबेर गेवराई येथील उद्धव कुबेर आणि गोपाळपूर येथील सुरेश वडेकर यांनी आत्महत्या केली. या सर्व तरुणांच्या कुटुंबियांची पहाटे तीन वाजेपर्यंत जरांगे यांनी भेटी घेतल्या. या तरुणांचा त्याग विसरता येणार नाही. कठीण प्रसंगात समाजबांधव तुमच्या पाठिशी असल्याचे सांगत त्यांनी संबंधित कुटुंबियांचे सांत्वन केले.
ओबीसी नेत्यांनी वेठीस धरू नये
माझा नियोजित दौरा गाठीभेठीसाठी असून सरकारवर दबाव आणायचा प्रयत्न नाही. साखळी उपोषण शांततेने होईल. जगातील आंदोलने याच मार्गाने होतात. त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. सरकारने आरक्षणाचा लेखी मसुदा दिलेला नाही. पण, दोन दिवसात अंतरवालीत सरकारचे शिष्टमंडळ येईल. जालन्यात ओबीसी नेते मोर्चा काढणार आहेत. ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करुन वातावरण बिघडू नये. राजकीय हट्टापायी सामान्यांना वेठीस धरू नये असे सामान्य ओबीसी बांधवांना वाटते, असे जरांगे यांनी सांगितले.
सरकारने २४ डिसेंबरपर्यंत न्या. शिंदे समितीकडून अहवाल घ्यावा आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणासाठी कार्यवाही करावी. गोरगरीब मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करुन अन्याय करू नये.
मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते
Read Latest Maharashtra News And Marathi News