दरम्यान, जोशी यांनी याप्रकरणात जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर जोशी कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिनांक ९/११/२०२३ रोजी ऍडव्होकेट ऋषिकेश करवंदे व समीर वैद्य यांच्यामार्फत दाखल केलेला जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. तीस हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तितक्याच रकमेचा जामीनदार न्यायालयात जमा करण्याचे आदेश देत न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
गॅस एजन्सीत रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जोशींविरोधात नऊजणांनी तक्रारी दिल्या होत्या. परंतू हा गुन्हा जोशी कुटुंबीयांची प्रतिमा मलिन करण्यासाठी करण्यात आला होता. कोरोना महामारीच्या काळात जोशी यांचा गॅस एजन्सीचा व्यवसाय आर्थिक व तांत्रिक संकटात सापडला होता. म्हणून जोशी यांनी काही जणांकडून हातउसने पैसे घेतले होते. त्यामध्ये काही सावकारांचा समावेश होता. त्यामुळे काही सावकरांनी गॅस एजन्सी ताब्यात घेण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीचे गुन्हे दाखल केल्याची माहिती जोशी कुटुंबांनी दिली. उदय जोशी हे सदाशिव पेठेतून १९९७ ते २००२ दरम्यान भाजपचे नगरसेवक होते. महिला आरक्षणानंतर त्यांच्या पत्नी शुभदा जोशी या नगरसेविका होत्या.
सिंहगड रोडवरील श्रीराम गॅस एजेन्सी ही २००१ पासून माजी नगरसेवक उदय जोशी यांचा मुलगा मयुरेश पाहत होता. ही गॅस एजेन्सी भारतातील क्रमांक १ ची पारितोषिक विजेती एजेन्सी आहे अशी माहिती त्यांनी दिली.
Read Latest Maharashtra News And Marathi News