मुंबईत फटाक्यांची खरेदी-विक्री, तसेच ते फोडण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री, बेकायदा फटाकेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अशातच उच्च न्यायालयाने मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी फटाके फोडण्यावर रात्री ८ ते १० असे वेळेचे बंधन घातले आहे. रात्री उशिरा फटाके फोडू नयेत. तसेच ध्वनिप्रदूषण करणारे फटाके फोडू नयेत, असे आवाहन करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नियंत्रण कक्षात, तसेच सोशल मीडियावरून फटाक्यांसंदर्भात येणाऱ्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. मोकळ्या ठिकाणी, मैदाने, चौपाट्या, समुद्रकिनारे या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. केवळ दोन तासांतच नागरिक फटाके फोडतात का, हे तपासणे थोडे अवघड असले तरी १०नंतर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेचे फटाक्यांबाबत अजब धोरण
महापालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना पर्यावरण पूरक अर्थात हरित फटाके फोडण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे पालिकेने दिवाळीत प्रदूषणाला घातक असणाऱ्या फटाक्यांच्या स्टॉलचे लिलाव काढून बक्कळ कमाई केलेली असताना दुसरीकडे नागरिकांना मात्र पर्यावरण पूरक व हरित दिवाळी साजरी करण्याचे आश्चर्यकारक आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. फटाक्यांसदर्भात पालिकेने दिवाळीत नियमावली जाहीर केली आहे. ध्वनी, जल, वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणारे फटाके वाजवू नयेत, असे आवाहन करतानाच, १४५ डेसीबलच्या पातळीचे फटाके उत्पादन आणि विक्रीस मनाई केली आहे.
दिवाळीच्या दोन दिवस अगोदर महापालिकेच्या पर्यावण विभागाने नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यात नागरिकांनी हरित फटाके फोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात मुंबई व पुणे या दोन शहरांमध्ये प्रदूषणाने पातळी गाठल्याने या शहरांसारखी गत नाशिकची होवू नये यासाठी पालिकेने नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. हवा ध्वनी जल व मृदा प्रदूषण वाढू नये यासाठी फटाके अती प्रमाणात वाजवू नयेत व लहान मुलांना धोकादायक नसलेले फाटाके वाजवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. फटाके फोडताना शक्यतो रात्री दहा नंतरच फोडावेत, फटाका वाजलेल्या स्थानापासून चार मीटर अंतरापर्यंत १४५ डेसिबल ध्वनी पातळीचे उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. एकीकडे पर्यावरण पूरक व फटाक्यांचे उत्पादन करण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेशित करताना याच महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी गाड्यांचे लिलाव केल्याने पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालिकेचा अजब फतवा
दिवाळीनिमित्त महसुलात वाढ व्हावी या उद्देशाने महापालिकेच्या वतीने फटाके गाळ्यांचा लिलाव करताना प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीस प्रोत्साहन दिले. तर दुसरीकडे नागरिकांकडून मात्र हरित दिवाळीचे आवाहन केले जात आहे. महापालिकेने पर्यावरण पूरक अर्थात हरित फटाके फोडा आणि तेही रात्री दहा वाजेनंतर फोडा, असे अजब आवाहन करणारे पत्र प्रथमच काढले. या अजब फतव्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यावर सारवासारव करून आपल्या आदेशात घाईघाईत बदल करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली.
Read Latest Maharashtra News And Marathi News