आनंद, उत्साह, चैतन्य, मांगल्य, तेजाची पाखरण करणारा दिवाळीचा सण हा अर्थव्यवस्थेला चालना देणारा असतो. वेगवेगळ्या क्षेत्रांत खरेदी-विक्रीचे व्यवहार या सणाला होत असतात. वर्षभराचे नुकसान भरून काढणारा हा सण यंदाही नागपूरच्या दृष्टीने चांगला राहिला. विशेषत: सराफा मार्केटचा विचार करता अंदाजे १०० किलो सोन्याची उलाढाल दिसून आली. मागीलवर्षीच्या तुलनेत यावेळी सोन्याचे दर वाढूनही विक्री तीस टक्क्यांनी वाढली. याबाबत ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले,‘मागीलवर्षी सोन्याचा दर जीएसटीविना प्रतिदहा ग्रॅम ५१ हजार ७०० रुपये होता. यंदा तो ६० हजार ७०० रुपये नोंदविण्यात आला. दरवाढ होऊनही विक्री कमी झालेली नाही. उलटपक्षी दरवर्षी दिवाळीनंतर दर अधिक वाढतात अशी भीती असल्याने अनेकांनी धनत्रयोदशीला सोनेखरेदी केली.’
सोना-चांदी ओळ कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष राजेश काटकोरिया म्हणाले, ‘अंगठी, कानातले याप्रकारच्या दागिन्यांना मागणी अधिक होती. सोने आणि चांदीचे दर सध्या स्थिर आहेत. परंतु, येत्या काही दिवसांत सोन्याचा दर जीएसटीविना प्रतिदहा ग्रॅम ६३ हजार ५०० आणि चांदीचा दर प्रतिकिलो ७५ हजारपर्यंत जाईल.’
धनत्रयोदशीला महाल, इतवारी, सीताबर्डी, सदर, गोकुळपेठ, खामला, सक्करदरा, पारडी, कमाल चौक, मनीषनगर येथील बाजारपेठांमध्ये दिवसभर ग्राहकांची गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरू होती. व्यापाऱ्यांनी धनत्रयोदशीला चोपडी पूजन केले. इतवारी येथील भांडे बाजारात पितळेची लक्ष्मीदेवीची मूर्ती तसेच इतर वस्तू विकत घेण्यात आल्या. येथे दिवसाकाठी तीन ते चार कोटींची उलाढाल झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
बाजारात झळाळी, ग्राहकांत उत्साह
दिवाळीमुळे बाजारांत रौनक आणि ग्राहकांमध्ये मोठा उत्साह आहे. दिवाळी पहिल्या आठवड्यात आल्यामुळे ग्राहकांच्या हातात पगार आणि बोनस दोन्ही आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘दिवाळसण मोठा, खरेदीला नाही तोटा’ याची प्रचिती आली. दुचाकी, चारचाकी वाहनांची अॅडव्हान्समध्ये बुकिंग करून धनत्रयोदशीला घरी घेऊन जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेडिमेड गारमेंट, सराफा मार्केट, भांडे बाजारात गतिमान उलाढाल झाली. यामध्ये रिअल इस्टेट आणि फर्निचरचे क्षेत्र जोडल्यास किमान पाच हजार कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी दिली.
सबसिडी घटूनही ईव्हीला मागणी
गेल्या दोन-अडीच वर्षांत इलेक्ट्रिक व्हेइकल अर्थात ईव्हीला मागणी वाढली आहे. दरम्यानच्या काळात सबसिडी कमी होऊनही यावर्षी दुचाकी, चारचाकी ईव्हीची विक्री वाढल्याचे चित्र आहे. अॅथर कंपनीच्या ईव्हीची विक्री करणारे आर्योदय इट्रॉनचे सेल्स मॅनेजर अमित उप्लव म्हणाले, ‘लोकांचा ईव्हीकडे कल वाढला आहे. आमच्या धरमपेठ येथील एका शोरूममधून धनत्रयोदशीला ५० गाड्यांची विक्री झाली आहे.’ साई डायनॅमिक्स टीव्हीएसचे संचालक अतुल झुलकंठीवार म्हणाले, ‘ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये ईव्ही दुचाकीचा वाटा १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आमच्या देवनगर येथील शाखेतून दिवसभरात ५० ते ६० ईव्ही तर पेट्रोल संचालित २०० दुचाकींची विक्री झाली आहे.’ कुसुमगर हिरोचे महाव्यवस्थापक महेश धकाते म्हणाले, ‘पेट्रोल संचालित दुचाकीप्रमाणेच ईव्हीला मागणी आहे. हिरोने इतर कंपन्यांच्या तुलनेत ईव्ही काहीशा विलंबाने मार्केटमध्ये आणली. परंतु, अल्पावधीतच या दुचाकीने पिकअप पकडला आहे.’
चारचाकीने टाकला गिअर
चारचाकी घेणे आता लक्झरी राहिलेले नाही. गेल्या काही वर्षांत विशेषत: करोनानंतर चारचाकी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचा अनुभव धनत्रयोदशीला आला. आदित्य टाटा कार्सचे महाव्यवस्थापक मंगेश चेटुले म्हणाले, ‘मागीलवर्षीच्या तुलनेत निश्चितच यावर्षी चारचाकीची विक्री वाढली आहे. चारचाकी ईव्हीचा खप १० ते १२ आणि इतर चारचाकीचा खप ७ ते ८ टक्क्यांनी वाढला. एसयूव्ही घेण्याला लोकांची पसंती आहे. आमच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या शोरूम्समधून धनत्रयोदशीला १०० गाड्यांची डीलिव्हरी झाली आहे.’ आर्या कार्सचे महाव्यवस्थापक नरेंद्र थोटे म्हणाले, ‘मारुतीने अद्याप ईव्हीमध्ये प्रवेश केलेला नाही. आमच्या ग्रेट नागरोडवरील एका शोरूममधून दिवसभरात पेट्रोल आणि सीएनजी संचालित १०० चारचाकींची डीलिव्हरी झाली आहे.
हवा मोठ्या आकाराचा एलईडी
५५ इंची आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या एलईडी टीव्हीची विक्री सर्वात अधिक झाली आहे. त्याशिवाय मोबाइल, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन यांना अधिक मागणी आहे, अशी माहिती श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीकांत भांडारकर यांनी दिली. दरवर्षी नागपूरचा विचार करता इलेक्ट्रॉनिक्स मार्केटची उलाढाल ५० कोटींच्या घरात असते. यंदाही हा आकडा कायम राखला असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.