धनत्रयोदशीला हमखास सोने खरेदीचा मुहूर्त साधला जातो आणि यंदाही सराफा बाजारात ग्राहकांची चांगलीच लगबग दिसून आली. अलीकडे तयार दागिन्यांना मागणी असते आणि हेच चित्र यंदाच्या धनत्रयोदशीला होते. अनेकांनी बुकिंग न करता थेट खरेदी केली, असे सराफा व्यापारी उदय सोनी यांनी सांगितले. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रती तोळा ६१ हजार, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५६ हजार १५० रुपये होता; म्हणजेच सोन्याचा भाव बऱ्यापैकी स्थिर होता, याचाही ग्राहकांना लाभ झाला, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले.
तयार दागिन्यांना प्रतिसाद
यंदाच्या धनत्रयोदशीला नेकलेस, चेन आदी सोन्याच्या दागिन्यांना जास्त मागणी दिसून आली, असे सांगताना सराफा व्यापारी नम्रता पुणेकर म्हणाल्या, अनेक एनआरआय ग्राहकांनी तर खास डिझाइनचे दागिने तयार करून घेतले आहेत. त्यामुळे यंदाची धनत्रयोदशी ग्राहकीच्या दृष्टीने चांगलीच होती, असेही पुणेकर म्हणाल्या.
मागच्या वर्षी चांदीच्या वस्तुंना लक्षणीय मागणी होती, तर यंदा सोन्याच्या दागिन्यांना जास्त मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकीच्या दृष्टीने यंदाची धनत्रयोदशी चांगलीच होती आणि अपेक्षेप्रमाणे विक्री झाली, असे सराफा व्यापारी प्रणित बोथरा म्हणाले.
गर्दीतही पावले वळली पेढीकडे
सध्या दिवाळीनिमित्त सर्वस्तरीय बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि याच गर्दीमुळे अगदी पायी चालणेदेखील कठीण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक ग्राहकांची पावले हळूहळू का असेना दागिन्यांच्या पेढीकडे वळताना दिसून आली.