कोल्हापुरातील कागल तालुक्यातील माद्याळ येथे राहणारे बाबुराव चौगुले यांची याच गावात तुकडाभर जिरायत शेती. याच शेतीवर ते आपल कुटुंब सांभाळतात. तशी आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यांना चार मुली आणि एक मुलगा त्यांचा सांभाळ करत आयुष्याच्या उतारवयाला लागलेल्या बाबुराव यांची तारेवरची कसरत सुरू आहे. बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने त्यांच्या छोट्याश्या घरात गेल्या ४० वर्षात विजेचा प्रकाशच पडला नाही. मात्र महावितरणच्याच दोन संवेदनशील अधिकाऱ्यांमुळे बाबुराव चौगुले यांचं घर दिवाळीपर्वाला सुरुवात होण्याच्या पूर्वसंध्येला उजळून निघालं आहे.
कोल्हापुरातील कागल तालुक्यातील साधारण २५० कुटुंब राहणार माद्याळ गाव. येथे राहणारे बाबुराव चौगुले यांनी अख्ख गाव मास्तर म्हणतं. मात्र हे शिक्षक नाहीत तरीही त्यांना संपूर्ण गाव मास्तर नावाने ओळखतो. कधीकाळी गावात त्यांनी मुलांना शिकवण्याचं काम केलं होतं असे गावकरी सांगतात. म्हणून त्यांच्या नावाला मास्तर ही पदवी गावकऱ्यांनीच लावली. गावातील कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे काम असो वा एखाद्याच्या निधनानंतरचे क्रिया. बाबुराव मास्तर एक खांबी किल्ला लढूनच घरी परततात, समाधानाचे आयुष्य जगताना चौगुले मास्तर यांना आर्थिक चणचण भासू लागली.
यातच वर्षभरापूर्वी आजारपणाने ग्रासले. गावातील दानशूर व्यक्तींनी वर्गणी काढून उपचाराचा खर्च भागवला. मात्र गेल्या ४० वर्षात बाबुराव चौगुले यांच्या घरात विजेचा प्रकाश काही पडला नाही. घरात पडलेल्या अंधारातून वाट शोधण्याचा प्रयत्न ७५ वर्षीय बाबुराव मास्तर करत होते. हे महावितरण मधील दोन कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना समजलं आणि त्यांनी बाबुराव मास्तर यांच्या घरात उजेड आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याला अनेक जणांचं बळ ही मिळालं. महावितरणचे अधिकारी प्रशांत करनूरकर आणि संग्राम घोरपडे यांनी बाबुराव मास्तर यांची डिपॉझिट भरून वीज जोडणीच्या साहित्यांसह चौगुले यांचं घर गाठलं.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घरातील वीज जोडणी पूर्ण केली आणि घरात दिवाळीच्या पूर्वसंध्येला प्रकाश पडला. यामुळे बाबुराव चौगुले यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सध्या महावितरणच्या प्रत्येक घरी दिवा प्रत्येक घरी दिवाळी या योजनेमधून गावातील प्रत्येक ग्राहकांच्या घरात वीज पोहोचली पाहिजे, असा उद्देश महावितरणचा आहे. मात्र हा उद्देश तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा अशा प्रामाणिक आणि कर्तव्य दक्षपणे काम करणारे अधिकारी मिळतात.