एक ७० वर्षीय वृद्ध महिला ३ नोव्हेंबर रोजी बाबा पेट्रोल पंप येथे रिक्षाची प्रतीक्षा करत थांबली होती. फिर्यादी महिलेस सिडको बसस्थानक येथे जायचे होते. त्यावेळी एक रिक्षाचालक तेथे आला व त्याने मी तुमच्य मुलासारखा आहे, तुम्ही माझ्या रिक्षात बसा अशी आपुलकी दाखवली. त्यानंतर त्या वृद्ध महिला रिक्षात बसल्या. त्यानंतर रिक्षाचालकाने गळ्यातील सोन्याची पोत तुमच्या पिशवीत काढून ठेवा, असे सांगितल्यावर फिर्यादी महिलेने सोन्याची पोत पिशवीत काढून ठेवली. दरम्यान, रिक्षाचालकाने सिडको बसस्थानकाकडे न जाता कोकणवाडी रेल्वे स्टेशन मार्गे कांचनवाडीकडे रिक्षा घेऊन गेला व तेथे एका ठिकाणी थांबवून रिक्षात पेट्रोल टाकण्यासाठी २० रुपये द्या, असे म्हणत वृद्ध महिले जवळील पिशवी घेतली व हातचालाखीने पिशवीतील सोन्याची पोत काढून घेतली व नंतर वयोवृद्ध महिलेस रिक्षातून खाली उतरुन निघून गेला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आणि आरोपी जाळ्यात अडकला
शफिक खान रफिक खान हा सराईत गुन्हेगार असून त्याने हा गुन्हा केल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. आरोपी हा मिल कॉर्नर येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याआधारे पथकाने सापळा लावला. संशयित आरोपी शफिक खान हा दिसताच पथकाने कारवाई करत त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याकडून सोन्याची पोत व रिक्षा असा एकुण एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त मनोजकुमार लोहिया, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास खटके, पोलिस हवालदार संतोष मुदीराज, पोलिस नाईक भावलाल चव्हाण, इरफान खान, संतोष सुर्यवंशी, मनोज चव्हाण, विरेश बने, रामकृष्णा आडे, कृष्णा चौधरी, सतिश इज्जपवार यांनी ही कामगिरी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करत आहेत.