त्यानंतर राज्याच्या कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर गणपती पूर्वी विमा रक्कम देण्याची ग्वाही देखील दिली होती. ते सुद्धा आश्वासन पोल ठरलेले पाहायला मिळाले. अगदी तीव्र पद्धतीने आंदोलन छेडले जाईल आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली. शिवसेना पक्षाने केलेल्या आंदोलनाला आणि पाठपुराव्याला यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात फळ पीक विम्याची रक्कम जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी वैभव नाईक, सतीश सावंत यांचे आभार मानले आहेत. जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी रु. रक्कम देण्याचे काम सुरु आहे.
पुढील दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हि रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना आंबा आणि काजू पीक विम्याची रक्कम दिली जात नसल्याने आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी १ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी कणकवली विजय भवन येथे वैभव नाईक आणि सतीश सावंत यांच्या समवेत बैठक घेऊन नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात संबंधित सर्व पात्र बागायतदारांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाई जमा करण्याची ग्वाही दिली होती. तसे लेखी पत्र विजयकुमार राऊत यांनी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.
जिल्ह्यातील आंबा काजू फळबागायदारांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून गेले काही महिने प्रशासन आणि शासनावर स्तरावर जोरदार संघर्ष सुरू होता. आमदार वैभव नाईक हे जिल्ह्यातील बागाईदारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी मंत्र्यांची वारंवार भेट घेऊन पाठपुरावा करत होते. थकलेल्या नुकसान भरपाईमुळे जिल्ह्यातील शेतकरी हा मेटाकुटीला आला होता. नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र अखेर ही नुकसान भरपाई मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची दिवाळी ही मात्र गोड झाल्याची पाहायला मिळत आहे. आंबा आणि काजू फळ पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आमदार वैभव नाईक आणि जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी माहिती दिली.