• Mon. Nov 25th, 2024
    बाह्यवळणाचे चित्र येत्या काही वर्षात बदलणार, ‘कात्रज बायपास’वर दोन उड्डाणपूल!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढत्या वाहतूक कोंडीसह अपघातांच्या मालिकेतून पुणेकरांसह बाहेरील प्रवाशांची सुटका होणार आहे. त्या करिता आता कात्रज- देहू बाह्यवळण महामार्गावर दोन उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) केंद्र सरकारकडे पाठविला आहे. कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी व्हायडक्ट ते सनसिटी अंडरबायपासपर्यंत सुमारे सव्वापाच किलोमीटर तसेच किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत सुमारे साडेआठ किलोमीटर लांबीचा हे दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या बाह्यवळणाचे चित्र येत्या काही वर्षात बदलल्याचे पहायला मिळणार आहे.

    नऱ्हे भागातील नवले पूलावरील अपघातांच्या मालिकांनी अनेकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे हा मार्ग म्हणजे मृत्यूचा महामार्ग म्हणून चुकीची ओळख निर्माण झाली आहे. या ठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सातत्याने विविध बैठका घेतल्या. त्याशिवाय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या संदर्भात बैठका घेऊन तोडगा काढण्याची भूमिका घेतली. परिणामी, या त्याबाबत मार्ग काढण्यात एनएचएआयला यश आले आहे. गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार, या मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी दोन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे.

    पूर्व, पश्चिम द्रुतगती हायवेंवरील वाहतूक कोंडीवर जालीम उपाय, BMC कडून नऊ जंक्शनवर तोडगा
    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नऱ्हे जवळील नवले पुलावर होणाऱ्या अपघातांचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून काही निष्कर्ष काढण्यात आले. त्या अभ्यासानुसार, एका लेनवरून वाहतूक वळवणे शक्य नसल्याने यासाठी अन्य उपाययोजना करण्याचे या अहवालात सुचविण्यात आले आहे. त्यानुसार उड्डाणपूल (उन्नत मार्ग) उभारल्यास वाहतूक सुरळीत होईल. तसेच या दोन जंक्शनजवळील अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे त्यात अहवालात म्हटले आहे.

    दोन उड्डाणपूल उभारणार

    या अहवालानुसार, एनएचएआयने सुमारे ५० किलोमीटर लांबीचा रस्त्याचा विचार केला आहे. यानुसार, जांभूळवाडी व्हायडक्टपासून सनसिटी अंडरपासपर्यंत सुमारे सव्वापाच किलोमीटरचा तीन लेनचा उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे. किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत सुमारे ८.६ किलोमीटरचा सहा लेनचा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. तसेच जंक्शनमध्ये सुधारणा, सेवा रस्त्यांचे जाळे तसेच पवना, मुळा व मुठा नद्यांवर पुलांची निर्मिती असे या प्रकल्प अहवालात म्हटले आहे. मुळा आणि मुठा नदीवर तीन लेनचे पूल प्रस्तावित असून पवना नदीवरील सध्याच्या पुलाचे विस्तारीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पाच्या विस्तारासाठी सुमारे चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

    Mumbai News: बोरिवली ते मुलुंड एका तासात टच, नव्या उड्डाणपुलाची खासियत; वेळेची होणार बचत
    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत या उपायोजना करण्यात येतील. त्यानंतर येथील अपघातांचे प्रमाण कमी होईल. – भारत तोडकरी, सल्लागार अभियंता, पुणे विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

    अभ्यासातील निष्कर्ष काय?

    -जांभुळवाडी ते देहूरोड जंक्शनपर्यंत अपघातांचे प्रमाण जास्त अधिक
    -जांभूळवाडी व नवले पुलादरम्यान ब्रेक नादुरुस्त होण्याच्या जादा प्रमाणामुळे अपघातात वाढ
    -किवळे जंक्शनजवळ तीव्र वळण असल्याने अपघात होतात
    -नवले पूल किवळे, भूमकर चौक, वाकड, पुनावळे तसेच ताथवडे जंक्शन येथील अंडरपासजवळ वाहतूक कोंडीत वाढ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *