• Tue. Nov 26th, 2024

    पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून नव्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम – प्रधान सचिव विकास खारगे

    ByMH LIVE NEWS

    Nov 8, 2023
    पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून नव्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम – प्रधान सचिव विकास खारगे

    मुंबई, दि. ८: महाराष्ट्र हा सांस्कृतिक दृष्ट्या अधिक प्रगत व्हावा, आपल्या संस्कृतीचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना घेऊन आपण सांस्कृतिक धोरण तयार करत आहोत. त्याचबरोबर पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, त्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले.

    महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधान सचिव श्री. खारगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, मिलिंद रायकर, अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य शैलेश चव्हाण यावेळी उपस्थित होते.

    श्री. खारगे म्हणाले की, दिनांक ८ ते १४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत या महोत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम होणार आहेत. रसिकांना या महोत्सवात साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित अनेक कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. या माध्यमातून नव्या कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

    पु.ल.देशपांडे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांनी संचार केला. त्यांच्या नावाने सुरू असलेल्या या अकादमीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम सातत्याने सुरू राहतील, असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक चळवळीला हातभार लावण्याची भूमिका विभाग बजावत असल्याचेही ते म्हणाले.

    यावेळी  सांस्कृतिक कार्य विभागाने हाती घेतलेल्या उपक्रमाची माहितीही त्यांनी दिली.

    नुकतेच राज्य शासनाच्या वतीने कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. याशिवाय,  सार्वजनिक ध्वनी यंत्रणाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार ऐकवून मंत्रालयात रोज सकाळी कामकाजाची सुरुवात होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

    ज्येष्ठ कवी श्री. म्हात्रे म्हणाले की, साहित्य पर्यावरणात कवितांचा बोलबाला असतो. यावेळी त्यांनी  पु.ल. यांच्यासह मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य, ग्रेस यासह अनेक कवी साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या साहित्य रसिकांवर गारूड केल्याचे सांगितले.

    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प संचालक श्रीमती जोगळेकर म्हणाल्या की,  गेल्या १३ वर्षापासून हा कला महोत्सव सातत्याने सुरू आहे. बहुआयामी .पुल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाला मानवंदना देण्यासाठी हा महोत्सव आहे. दिग्गज आणि नवोदित कलाकार यांची कला या महोत्सवात रसिकांना अनुभवता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला विशेष मुलांनी तयार केलेल्या भेटवस्तू देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच उद्घाटनानंतर कलांगण येथेच काफिला, कोल्हापूर या संस्थेचा मराठी, हिंदी, उर्दू, प्रेम साहित्यावर आधारित ‘जियारत’ हा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. त्यालाही रसिकांनी छान प्रतिसाद दिला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उत्तरा मोने यांनी केले तर आभार स्नेहल शिंदे यांनी मानले.

    0000

    दीपक चव्हाण/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed