गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोबाइलवर व्हिडिओ पाहत वाहने चालविण्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी चांदणी चौकापासून स्वारगेटपर्यंत एसटीचालक मोबाइलवर चॅटींग करीत गाडी चालवित असल्याचे समोर आले होते. पीएमपीचा चालकही बस चालविताना चित्रपट पाहत असल्याचा प्रकार घडला होता. या दोन्ही चालकांवर संबंधित यंत्रणांनी कारवाई केली होती. मात्र, यानंतरही शहरात असे प्रकार सुरू आहेत.
मोबाइलचा वापर वाढला
कानात हेडफोन लावून समोर मोबाइल ठेवून गाडी चालविताना क्रिकेट मॅच, चित्रपट पाहण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पण, याकडे वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) दुर्लक्ष होत आहे. गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. दुचाकी चालकांपासून ते मोठे ट्रक, कंटेनरचालक गाडी चालविता मोबाइलवर बोलताना दिसत आहेत.
ही होऊ शकते कारवाई
मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, पाहणे ही गंभीर बाब आहे. अशा व्यक्तीचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई ‘आरटीओ’ करू शकते. वाहन चालविना मोबाइलचा वापर केल्यास वाहतूक पोलिस दहा हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करू शकतात. ‘समृद्धी’ मार्गावर मोबाइलवर व्हिडिओ पाहत बस चालविणाऱ्या चालकाचा नुकताच वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
कॅबच्या तक्रारी वाढल्या
विमानतळावरील एरोमॉल येथे प्रवाशांसाठी कॅबची व्यवस्था करण्यात आली आहे. या एरोमॉलमध्येच कॅब पार्किंगला जागा देण्यात आली आहे. कॅब बुकिंग केल्यास प्रवाशांना दुसऱ्या मजल्यावरून कॅब पकडता येते; पण अनेकदा कॅब वेळेवर न येणे, जास्त भाडे आकारणे, बुकिंग रद्द करणे अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. एका महिला प्रवाशाने त्यांना शुक्रवारी आलेला अनुभव सोशल मीडियावर व्यक्त केला. एरोमॉलमध्ये आल्यानंतर १२ वाजून २३ मिनिटांनी त्यांनी ‘ओला’ची कॅब बुकिंग केली होती. मात्र, प्रत्यक्ष कॅबचालक एक वाजता आला.
Read Latest Maharashtra News And Marathi News