भेसळयुक्त अन्न पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिठाई वाटप करणाऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा नियम आणि स्वच्छतेचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील नोंदणीकृत खाद्य विक्रेत्यांकडून अन्न पदार्थ घेण्यास प्राधान्य द्यावे, असे एफडीएचे पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी सांगितले.
दिवाळीच्या दिवसांमध्ये तूप, रवा, खवा, तेल, डाळीचे पीठ या पदार्थांची सर्वाधिक विक्री होते. त्यामुळे या पदार्थ्यांमध्ये सर्वाधिक भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे या पदार्थ्यांच्या विक्रीवर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच कच्चा माल आणि मिठाईचे संशयित नमुने भेसळ तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. निकृष्ट दर्जाची मिठाई आढळून आल्यास नागरिकांनी १८००२२२३५६ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही एफडीएने केले आहे.
अनेक ठिकाणी संघटनांकडून, कार्यकर्त्यांकडून, राजकीय नेत्यांकडून नागरिकांसाठी मोफत दिवाळी फराळ दिला जातो. मिठाई वाटप मोठ्या प्रमाणात असल्याने अधिकाधिक स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र, नागरिकांच्या गर्दीमुळे यावर मर्यादा येत असतात. आता एफडीए अशाप्रकारच्या मिठाई वाटपावर लक्ष ठेवणार असल्याने मोफत मिठाई वाटप करण्यासाठी कार्यकर्ते अनिच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहेत.