• Sat. Sep 21st, 2024

कोण होणार कारभारी? पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, ४९ ठिकाणी बिनविरोध सरपंच

कोण होणार कारभारी? पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, ४९ ठिकाणी बिनविरोध सरपंच

म. टा. प्रतिनिधी, पुणे : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २३१ ग्रामपंचायती आणि १४२ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकींसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८४९ सदस्यांची आणि ४९ सरपंचांची बिनविरोध निवड झाली असून, ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या २३१ ग्रामपंचायत व १४२ ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. निवडणूक प्रक्रियेनुसार २३१ ग्रामपंचायतींमधील दोन हजार ४० सदस्यपदांसाठी निवडणूक होणार होती. माघारीच्या मुदतीनंतर ८४९ सदस्यांची निवड बिनविरोध झाली. त्यामुळे १८४ ग्रामपंचायतींमधील एक हजार १३२ सदस्यांची निवड मतदारानंतर निश्चित होणार आहे. ५९ सदस्यपदांसाठी एकही अर्ज न आल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. त्यात सर्वाधिक २४ जागा आंबेगाव तालुक्यातील आहेत, भोर तालुक्यात १७, तर मुळशी तालुक्यातील नऊ सदस्यांची पदे रिक्त राहतील.
पुणेकरांची काळजी वाढवणारी बातमी! जिल्ह्यातील भूजल पातळीत घट, कोणत्या भागात फटका अधिक?
जिल्ह्यात ३७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. सर्वाधिक १२ ग्रामपंचायती भोर तालुक्यातील असून, मावळमधील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मुळशी, आंबेगाव व पुरंदरमध्ये प्रत्येकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

४९ ठिकाणी सरपंचपद बिनविरोध

मुळशी, वेल्हे व भोर तालुक्यांतील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीमधील सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. ४९ ठिकाणी सरपंचपद बिनविरोध झाले आहे. भोर तालुक्यातील सर्वाधिक १३ ठिकाणी सरपंचपद बिनविरोध झाले आहे. आंबेगाव तालुक्यात नऊ, खेड तालुक्यात आठ, जुन्नर तालुक्यात सहा, मुळशीत चार, दौंड व बारामतीत प्रत्येकी एक आणि पुरंदरमध्ये तीन ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद बिनविरोध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed