संबंधित व्यक्तीने कोथरूड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. त्यावरून कोथरुड पोलिसांनी अज्ञात मोबाइल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार तीन नोव्हेंबरला घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूड परिसरात राहतात. अनोळखी मोबाइलनंबर वरून त्यांना फोन आला. समोरील व्यक्तीने तो संतोष जाधव असल्याचे सांगितले. त्याने खंडणीची मागणी करून, पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली. तसेच, कुटुंबियांना मारण्याचीही धमकी दिली. त्यानंतर तुला दिवाळी साजरी करायची असेल, तर आता ५० हजार रुपये दे असे धमकावले. कोथरूड पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी तातडीने पावले उचलली. आरोपींचा माग काढण्यासाठी व्यावसायिकाला धमकीचा फोन आलेल्या मोबाइल क्रमांकाची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संशयावरुन दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे.
कोण आहे, संतोष जाधव
संतोष सुनील जाधव (वय २८, रा. पोखरी, ता. आंबेगाव) आणि त्याच्या सहा साथीदारांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी जुलै महिन्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. तो सध्या कारागृहामध्ये आहे. नारायणगाव येथील व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, पूर्ववैमनस्यातून मंचर परिसरात ओंकार उर्फ राण्या बाणखेले याचा खून केला आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या प्रकरणात त्याच्यावर मकोका कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर जाधव मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पसार झाला. त्यानंतर तो पंजाबमधील गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला होता. जाधव आणि त्याच्या मित्रांनी हरयाणात पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार केली होती.