शनिवारी रात्रीपासूनच एकनाथ खडसे यांना बरं वाटत नव्हतं. त्यांच्या छातीत जळजळ होत होती. आज दुपारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना जळगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
तत्पूर्वी डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, “एकनाथ खडसे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या छातीत जळजळ होत होती. त्यांच्या छातीतही दुखत होतं, त्यांना वेदना होत होत्या. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यांच्या छातीत इन्फेक्शन झालं आहे. त्यांची शुगर स्टेबल आहे. उपचारानंतर सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही वेळापूर्वी त्यांनी आमच्याशी गप्पाही मारल्या”.
काही वेळातच जळगाव विमानतळावरून त्यांना एअर अँब्युलन्सने मुंबई येथे नेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देखील दिली आहे. तसेच नाथाभाऊंची लेक रोहिणी खडसे यांनीही प्रसारमाध्यमांना याबाबत अवगत केले.
सध्या आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर जळगावातील गजानन हार्टकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना एअर अँब्युलन्सने मुंबई येथे नेण्यात येईल. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.