• Sat. Sep 21st, 2024
सराईत गुंडासोबत वैर; पहाटेच टोळक्यांनी घेरलं, झुडपात नेलं अन् धक्कादायक कृत्य, कल्याणमध्ये काय घडलं?

ठाणे: उल्हासनगर शहरातील एका सराईत गुंडाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर मधील माणेरे गावच्या रस्त्यालगतच्या झाडाझुडपात नेऊन त्याची चार ते पाच जणांच्या हल्लेखोर टोळीकडून हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी फरार हल्लेखोर टोळीचा शोध सुरू केला आहे. स्वप्नील कानडे असे हत्या झालेल्या गुंडांचे नाव आहे.
तरुणाने प्रेयसीची छेड काढली; प्रियकर संतापला, दोघांना रस्त्यात गाठलं, अन् केला रक्तरंजित शेवट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गुंड स्वप्नील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ४ ते ५ जणांच्या हल्लेखोर टोळीने आज पहाटेच्या ५ वाजल्याच्या सुमारास उल्हासनगर शहरातील एसएसटी कॉलेजलगत असलेल्या सतगुरु वाशिंग सेन्टरच्या मागे झुडपात नेऊन स्वप्नीलवर हल्ला केला. ह्या हल्ल्यात स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. स्वप्नीलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

स्वप्नील हा सराईत गुन्हेगार असून अनेकांसोबत त्याचे वैर होते. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी पहाटेच्या सुमारास माणेरे गावातील रस्त्यावर असलेल्या सतगुरु वॉशिंगच्या मागे स्वप्नीलला गाठून लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात स्वप्नील मृत झाल्याचे पाहून हल्लेखोर टोळीतील ४ ते ५ गुंड घटनास्थळावरुन फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

हृदयविकाराचा सौम्य झटका, एकनाथ खडसेंना पुढील उपाचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणणार

या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्याशी संपर्क साधला असता आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हत्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस पथकासह उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत आहे. तर काही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. उल्हासनगर शहराची उद्योग नगरी म्हणून ओळख आहे. मात्र आता हे शहर गुन्हेगारांच्या विळख्यात अडकल्याने येथील व्यापारी आणि नागरिक या गुंड टोळीचा बंदोबस्त करा, अशी मागणी एकीकडे करत आहेत. दुसरीकडे स्वप्नील कानडे या सराईत गुंडाची आज रविवारी पहाटेच्या सुमारास हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed