केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सायंकाळी एका भरगच्च पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सुमारे ४० दिवसांपूर्वींची पहाट पश्चिम नागपुरातील रहिवाशांसाठी प्रचंड नुकसान करणारी ठरली. शहराच्या अन्य भागांतही मोठा फटका बसला. यातून मार्ग काढण्यासाठी अंबाझरी, नाग नदीविषयीच्या योजना गडकरी, फडणवीस यांनी जाहीर केली.
दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार असल्या तरी पुढच्यावर्षी पावसाळ्यात अशा संकटांतून दिलासा मिळेल. क्षतीग्रस्त नदी, नाल्यांच्या भितींचे बांधकाम, रस्त्यांचे डांबरीकरण आणि पुलांच्या पुनर्बांधकामासाठी २३४ कोटी २१ लाख रुपयांची योजना महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला सादर केली. ही कामे तातडीने सुरू करण्यासाठी सरकार निधी देईल, असे फडणवीस यांनी सांगितले. आपत्ती निवारणासाठी उपाययोजना म्हणून शहरातील सर्व नदी-नाल्यांचे काम केले जाईल. रिटेनिंग वॉल्स, पूल आणि इतर बांधकामे होतील. ८४८ कोटी ७२ लाख रुपयांची ही योजना आहे. यास तत्त्वत: मान्यता देण्यात येईल. ही कामे टप्प्याटप्प्याने केली जातील, असे फडणवीसांनी सांगितले. तर ‘अंबाझरी तलावाचे पाणी मागच्या बाजूस जावे, याचा विचार केला जात आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या परिसरात पाण्यावर प्रक्रिया करून इतर भागांत पुरवठा करण्याबाबत चर्चा सुरू आहे’, असे गडकरी म्हणाले. हिंगणा औद्योगिक वसाहतीत पाण्याचा उपयोग होऊ शकतो का, हे तपासण्याची सूचना उद्योग विभागाला केली असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
नुकसानीचा रस्त्यांशी संबंध नाही!
‘कुणी काहीही बोलतात, फालतू गोष्टीची आम्ही दखल घेत नाही. सिमेंट काँक्रिट रस्त्यांनी पावसाला आमंत्रण दिले का? त्यादिवशी झालेल्या नुकसानाचा रस्त्यांशी काहीही संबंध नाही, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
नाग नदीवरील अतिक्रमण काढणार
नाग नदीतील आत आणि बाहेरील अतिक्रमण काढण्यात येईल. नदीसाठी २ हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पास जपान जायका संस्थेने मान्यता दिली आहे. असे असले तरी, महापालिका व त्यांच्या कामात तांत्रिक वा इतर अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.