• Sat. Sep 21st, 2024

पाच वर्षांपासून PF गायब? पुणे कॅंटोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांना स्टेटमेंटच नाही

पाच वर्षांपासून PF गायब? पुणे कॅंटोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांना स्टेटमेंटच नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे : भविष्यात म्हातारपणाचा आधार ठरणाऱ्या भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) ठावठिकाणाच माहीत नसल्याचा प्रकार पुणे कँटोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांबाबत घडला आहे.

– ‘पीएफ’ सुरक्षेचा प्रश्न

कँटोन्मेंटच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या ‘पीएफ’चे विवरण पत्र (पीएफ स्टेटमेंट) मिळाले नाही. परिणामी, पाच वर्षांत कर्मचाऱ्यांच्या पगारातून जमा केलेल्या पैशांचे व्याज किती जमा झाले, पीएफच्या खात्यातील एकूण रक्कम किती, सरकारने त्यांच्या वाट्याची किती रक्कम जमा केली, याची कोणतीही माहिती मिळू न शकल्याने पीएफ सुरक्षित आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

– ‘ऑडिट प्रक्रिया सुरू’

कँटोन्मेंट प्रशासनाने याबाबत ऑडिटचे कारण पुढे केले आहे. ‘ऑडिट प्रक्रिया सुरू असल्याने कर्मचाऱ्यांना विवरण पत्र मिळालेले नाही,’ असे कँटोन्मेंटच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, ‘इतकी वर्षे ऑडिटचे कारण देणे संयुक्तिक आहे का,’ असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पुणे कँटोन्मेंटमध्ये सध्या जवळपास ७०० कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. त्यापैकी ३५०हून अधिक कर्मचारी २००४च्या आधीपासून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना दर वर्षी त्यांच्या पीएफच्या रकमेचे विवरण मिळणे अपेक्षित आहे. मात्र, २०१८पर्यंत हे विवरण दरवर्षी मिळत होते. त्यानंतर एकदाही विवरण पत्र मिळाले नसून, पाच वर्षे हेच चालले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

– यापूर्वीही केली मागणी

या संदर्भात कँटोन्मेंटच्या पूर्ण वेळ कर्मचारी, शिक्षकांनी अनेकदा निवेदने देऊन प्रशासनाकडे पीएफ स्टेटमेंटची मागणी केली आहे. त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसून, उलट उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचा तिढा पुढील महिन्यात सुटणार असून, ऑडिटमुळे ही प्रक्रिया लांबली असल्याचे कँटोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी सांगितले आहे.
ताजमहाल शाहजहानने बांधला नाही? दिल्ली हायकोर्टात याचिका, ताजचा खरा इतिहास सांगण्याची मागणी
कायदा काय सांगतो?

भविष्य निर्वाह निधीच्या १९६०च्या कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दर वर्षी त्याच्या भविष्य निर्वाह निधीचे विवरण पत्र मिळायला हवे. या पत्राद्वारे कर्मचाऱ्याच्या रकमेबरोबर सरकारने किती रक्कम ‘पीएफ’मध्ये जमा केली, त्या रकमेवर किती व्याज जमा झाले, याची माहिती मिळते. ही माहिती कर्मचाऱ्यांना कळणे अपेक्षित आहे. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे कँटोन्मेंट प्रशासनानेच कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पगारातून नियमित कपात

कँटोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांना विवरण पत्र मिळत नसले, तरी दरमहा त्यांच्या पगारातून ‘पीएफ’ची रक्कम न चुकता वजा केली जात आहे. ‘पाच वर्षे नियमित ही रक्कम कापून घेतली जात असेल, तर मग या पैशांचा हिशोब कधी मिळणार,’ असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed