पुण्यातील सर्व खासगी बस मालकांची बैठक गुरुवारी आरटीओ कार्यालयात झाली. बैठकीत ‘आरटीओ’कडून बसमालकांना दरवाढीबरोबरच प्रवासी, बसची सुरक्षितता, चालकांचे आरोग्य, स्वच्छता आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिवाळीत खासगी बस चालक अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून प्रवाशांची लूट करीत असल्याची दर वर्षी ओरड होते. काही ठरावीक ट्रॅव्हल्स मालकांबाबत वारंवार तक्रारी येत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर तिकिटांचे दर आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
खासगी ट्रॅव्हल्स चालकांना एसटीच्या तिकिटदराचा तक्ता दिला जाणार आहे. निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात जवळपास हजार ते बाराशेच्या आसपास खासगी बसची संख्या आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, आगामी सणासुदीत बसची संख्या वाढते. भाडेतत्त्वावरील बस किती सुरक्षित आहेत ते पाहणेही आवश्यक आहे, असेही मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
कारवाईसाठी चार पथके
दिवाळीमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी अधिक असते. एसटी आणि रेल्वेंचे आरक्षण आधीच झाल्यामुळे खासगी बसला मोठी गर्दी असते. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मोठ्या संख्येने बस महामार्गांवर धावतात. या पार्श्वभूमीवर मार्गांवरील बसची तपासणी करण्यासाठी ‘आरटीओ’कडून चार पथके तैनात केली जाणार आहेत.
‘रेडबस’, ‘अभिबस’ला तंबी
बहुतांश प्रवासी ‘रेडबस’, ‘अभिबस’ आदी यासह अन्य अॅपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करतात. दिवाळीमध्ये काही कंपन्यांकडून ‘अॅप’वरील दरांत वाढ केली जाते. या पार्श्वभूमीवर ‘रेडबस’ आणि ‘अभिबस’ या अॅप कंपन्याशी चर्चा करून ‘आरटीओ’ने तंबी दिली आहे.
एसटीच्या तिकीटदराच्या पन्नास टक्क्यांहून अधिक दरवाढ करू नये. या संद्रभात तक्रारी आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. त्यासाठी प्रवाशांनी आरटीओच्या ई-मेलवर तक्रार नोंदवावी. याशिवाय तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचे नियोजन आहे.
– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे