ड्रग्ज निर्मिती करून राज्यभरात विक्री करत ड्रग्जचं जाळे पसरवणारा ललित पाटीलला मुंबई गुन्हा शाखेने चेन्नई येथून अटक केली होती. पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना ससूनच्या दारातच अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन किलोचे एमडी मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले होते. त्याच रात्री ललित फरार झाला होता. मात्र, तो फरार झाला की त्याला फरार केलं गेलं होतं? याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना ललित पाटील प्रसार माध्यमांसमोर म्हणाला की, “मी ससून रुग्णालयात पळालो नाही, तर मला पळवलं गेलं होतं”, असा मोठा गौप्यस्फोट ललित पाटीलने त्यावेळी केला होता. त्यानंतर अनेक राजकीय मंडळींनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या.
मुंबई पोलिसांची चौकशी संपल्यानंतर ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना दिला होता. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्या. बिराजदार यांनी ७ दिवसाची कोठडी सुनावली आहे. वकिलांच्या युक्तिवादा दरम्यान ललित पाटील याने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. तो आजारी असताना ससून रुग्णालयात त्याच्यावर हार्णीयाची शस्त्रक्रिया सुरू होती. त्यावेळी पोलिसांनी पैशांसाठी बेदम मारहाण केली, असा आरोप ललित पाटीलने केला.
ललित पाटीलला पुणे पोलिसांकडून जीवाचा धोका आहे, म्हणून ललितच्या वकिलांनी पोलीस कोठडीला नकार दिला होता. मात्र, एसीपी तांबे यांनी विरोध करत चाकणच्या गुन्ह्यामध्ये असा काही प्रकार घडला असेल, पण पुणे पोलिसांनी मारहाण केली नाही, अशी बाजू त्यांनी मांडली. काही वेळच्या युक्तिवादानातर ललितला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.