मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नवीन या गावातील धाडवेवाडीत राहणार हा तरुण आहे. चार-पाच महिन्यांपूर्वीच तो पुणे येथून गावी आला होता. गावाजवळ लोटे एमआयडीसीत नोकरी करत आपलं कुटुंब सांभाळत होता. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा खेड गुणदे फाटा येथे घडली. युवराज धाडवे कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेड तालुक्यात लवेल धाडवेवाडी येथे असलेले युवराज नारायण धाडवे यांचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. पुणे येथे घरोघरी वृत्तपत्रे टाकण्याचे काम युवराज करत होता.
लोटे एमआयडीसीत नेरोलॅक कंपनीमध्ये तो कंत्राटी स्वरूपाची नोकरी गेले चार ते पाच महिने काम करत होता. या अपघातप्रकरणी संशयित आरोपी बस चालक चिपळूण तालुक्यातील वालोपे येथील सुदेश वामन गमरे (५२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. युवराज धाडवेचे तीन वर्षांपूर्वीच नुकतेच लग्न झाले होते. त्याची पत्नी घरडा हॉस्पिटल येथे मदतनीस आहे. युवराज धाडवे यांच्या पश्चात आई वडील पत्नी असा परिवार आहे.
युवराज नारायण धाडवे यांच्या अपघाती निधनाने लवेल परिसरावर शोककाळा पसरली आहे. युवराजच्या अपघाती निधनामुळे त्याच्या मित्र परिवाराकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे. युवराज धाडवे याच्या ताब्यातील मोटार सायकल क्रमांक एम.एच. १२ जे एच. १८९१ या दुचाकीला जोराने धडक देऊन चालकाने आपल्या ताब्यातील बस हयगयीने आणि बेदरकारपणे चालवल्याचे समोर आले आहे. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे लक्ष न देता युवराज धाडवे याला धडक देऊन त्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी चालक सुदेश वामन गमरे याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.