पंजाबी कॉलनीमधील इमारती या अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्यानंतरही रहिवासी घरे रिक्त करत नसल्याचे पाहून महापालिकेने वीज-पाणी तोडण्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, सन २०१७मध्ये पालिकेचे अधिकारी कार्यवाहीसाठी गेले असताना सेल्वन व अन्य आरोपींनी जवळपास १२०० लोकांचा बेकायदा जमाव जमवला. तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांची अधिक कुमक आल्यानंतरच जमावावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले, असा आरोप होता. विशेष सरकारी वकील सुमेश पंजवानी यांनी आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्तांसह १३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या होत्या.
विशेष सरकारी वकील सुमेश पंजवानी यांनी आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्तांसह १३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. त्याचबरोबर अन्य ठोस पुरावेही दिले. मात्र, आरोपींनी न्यायालयात आपला जबाब नोंदवताना आरोपांचे खंडन केले होते. ‘सरकारी पक्षाच्या इतक्या साक्षीदारांनी तुमच्याविरोधात साक्ष का दिली असेल?’, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला असता, ‘मैं आमदार है, मेरा नाम खराब करना है उनको’, असे उत्तर आमदार सेल्वन यांनी दिले होते.
न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीअंती सेल्वन यांना दोषी ठरवल्यानंतर त्याबद्दल काही म्हणायचे आहे का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. तेव्हा आपण काहीच चुकीचे केले नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर अॅड. पंजवानी यांनी सेल्वन व अन्य दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. तर ‘आरोपींचा हा पहिलाच गुन्हा आहे आणि ते चांगले लोक आहेत. त्यामुळे न्यायालयाने आरोपींचे वर्तन लक्षात घेऊन कमी शिक्षा द्यावी’, अशी विंनती आरोपींच्या वकिलांनी केली. त्यानंतर न्यायालयाने पाचही जणांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. या निर्णयाची सविस्तर प्रत नंतर उपलब्ध होईल.
Read Latest Maharashtra News And Marathi News