• Mon. Nov 25th, 2024

    मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरुन मनोज जरांगेंशी चर्चा, विश्वासू सहकारी अंतरवाली सराटीत पाठवला

    मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरुन मनोज जरांगेंशी चर्चा, विश्वासू सहकारी अंतरवाली सराटीत पाठवला

    मुंबई: उग्र आणि हिंसक स्वरुप धारण केलेले मराठा आरक्षण आंदोलन शमवण्यासाठी राज्य सरकारकडून पडद्यामागे वेगवान हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने कुणबी दाखले दिले जातील, अशी घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरुच ठेवले होते. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळावीत, ही मागणी त्यांनी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात २० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना तब्येत जपण्याचा सल्ला दिला. तर मनोज जरांगे पाटील यांनी, मराठा समाजाला अर्धवट आरक्षण नको, याचा पुनरुच्चार केला. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाणी पिण्याची तयारी दर्शविली आहे.

    Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा आमदारांची एकजूट, गुप्त ठिकाणी बैठक? राज्य सरकारवर दबाव आणण्याची रणनीती

    आतापर्यंत मनोज जरांगे पाटील हे त्यांना येणाऱ्या प्रत्येक नेत्याचा फोन लाऊडस्पीकरवर टाकून प्रसारमाध्यमांना ऐकवत होते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेचा सर्व तपशील तातडीने उघड केलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील आता मराठा अभ्यासकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर जरांगे पाटील पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर साधारण साडेदहाच्या सुमारास मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

    Maratha Reservation: आरक्षणाचा अर्धवट जीआर काढू नका, मनोज जरांगे यांचे सरकारला आवाहन

    मनोज जरांगेंच्या सभेसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळणार

    एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मराठा आरक्षणावरुन चर्चा सुरु आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे अंतरवाली सराटी येथे पोहोचले आहेत. मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यातील चर्चेचा दुवा ठरण्याची शक्यता आहे. मात्र, चिवटे यांनी आपण एका वेगळ्या कारणासाठी अंतरवाली सराटीत आल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली होती. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक उपटून सभेसाठी मोकळे मैदान उपलब्ध करुन दिले होते. या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून मदत मिळणार असल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले.

    अंतरवाली सराटी येथील सभेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे झाले आहेत. त्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत, अशी माहिती मंगेश चिवटे यांनी दिली.

    माझी मुलगी आजारी, तरी रात्री ट्रेन पकडून जालन्यात आली; जरागेंची अवस्था पाहून नांदेडहून आलेली बहीण धास्तावली!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed