मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नाशिकमध्ये जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर सकल मराठा समाजाचे उपोषण सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनीही उपोषणाचे अस्र पुकारले असून जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यभरात मराठा आक्रमक झाला आहे. नाशिकमधील आंदोलनाचा सोमवारी ४८ वा दिवस होता. या आंदोलनाला संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट देऊन आरक्षणास पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु, आजतागायत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे उपोषणस्थळी आले नव्हते. त्यावेळी गोडसेंना मराठा समाजातील तरुणांची जाब विचारत त्यांना खडे बोल सुनावले. नाना बच्छाव, सचिन पवार, संजय देशमुख, ॲड. कैलास खांडबहाले, सचिन निमसे या तरुणांसोबत गोडसेंचा वाद झाला. त्यामुळे गोडसेंनी दबावात येत सांयकाली मराठा आरक्षणा बाबत समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता राजीनामा दिला असल्याचं जाहीर केले आहे. राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने मराठा समाज नाराज असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
मतदानासाठी मराठा हवा का?
सोमवारी गोडसे आंदोलनस्थळी आल्यानंतर आंदोलकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. इतके दिवस तुम्ही कुठे होतात. निवडणुकीत मराठा हवा, मग अडचणीत त्याला एकटे सोडता का, असा जाब आंदोलकांनी गोडसेंना विचारला.यावेळी गोडसेंना आंदोलन स्थळावरून माघारी फिरण्याच्या घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षणाबाबत इतकी आत्मियता असेल तर, संसदेत या विषयावर आवाज उठवा, खासदारकीचा राजीनामा का देत नाही, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गोडसेंनी घाई गडबडीत संध्याकाळी राजीनाम्याचे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल केले.
काय म्हटलंय राजीनामा पत्रात?
आरक्षणासाठी मागील महिन्याभरापूर्वी समाजाने पुन्हा तीव्र चळवळ आमरण उपोषण सुरू केले होते. दिलेल्या मुदतीत शासनाकडून आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने त्यांनी मागील आठवड्यापासून पुन्हा आरपारच्या लढाईसाठी समाजातील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. यामुळे राज्यभरातील तमाम मराठा समाजामध्ये आता आरक्षण मिळालेच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही, अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याने मराठा समाजाच्या भावनांचा आता राज्यभर उद्रेक होऊ लागला आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना विचारात घेऊन मी आपल्या पक्षाचा लोकसभा सदस्य असल्यामुळे माझ्या खासदारकीचा राजीनामा आपणांकडे सादर करीत असल्याचे गोडसेंनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
राजीनामा म्हणजे स्टंटबाजी
दरम्यान गोडसेंचे राजीनामा पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर या पत्राचीही खिल्ली उडवली जात आहे. खासदाराच्या राजीनाम्याची एक नियमावली असते. एखाद्या खासदाराला राजीनामा हा लोकसभा अध्यक्षांकडे द्यायचा असतो. परंतु, गोडसेंनी राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे, अशा शब्दात गोडसेंवर सोशल मिडीयावर टीका केली जात आहे. हे राजीनामा पत्र म्हणजे स्टंटबाजी असल्याचीही टीका गोडसेंच्या राजीनामा पत्रावर केली जात आहे.