जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय म्हटलंय?
बीड जिल्हयात मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या अनुषंगाने जिल्हयातील विविध भागात आंदोलन, उपोषण चालू आहेत. दिनांक २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. जिल्हयात परिवहन महामंडळ व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनास आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. ज्याअर्थी आज दि. ३० ऑक्टोबर रोजी आंदोलकांनी विविध शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढून कार्यालये बंद केली व काही ठिकाणी कार्यालयास आगी लावणे व दगडफेक करणे असे प्रकार घडले आहेत. यामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
बीड जिल्हयात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेस मोठया प्रमाणावर हानी पोहोचत आहे. याबाबत मी स्वतः खात्री केलेली आहे. त्यामुळे जिल्हयात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णयाप्रत मी आले आहे, असं दिपा मुधोळ मुंडे यांनी म्हटलं आहे.
वेळेअभावी सर्व संबंधित यांना नोटीस बाजवून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, बीड या पदावरुन प्राप्त अंगीभूत अधिकाराचा वापर करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ ( २ ) अन्वये एकतर्फी बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या हद्दीपर्यंत तसेच सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करत आहे, असं दिपा मुधोळ मुंडे यांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे.
बीड बसस्थानकातील बसेस फोडल्या
बीड बस स्थानकात जवळपास शंभरहून अधिक बस या उभ्या आहेत. मात्र, आज सायंकाळी या बसेस मराठा आंदोलकांनी फोडल्या आहेत. बसस्थानकातील दोन बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या बसेस जाळण्याचा प्रयत्न फसला आहे. यामध्ये पन्नासहून अधिक बसेसची तोडफोड करण्यात आली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News