सरकारला ४० दिवसांचा अवधी दिल्यानंतर दुसऱ्यांदा प्राणांतिक उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती बरीच खालावली आहे. आज रविवारी जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगेनी उपचारास नकार दिला असल्याने त्यांच्या प्रकृतीवर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. मला बोलता येतंय, तोपर्यंत चर्चेला या, नंतर काही फायदा होणार नाही, असा संदेश त्यांनी सरकारला दिला आहे. जरांगेंची प्रकृती पाहून संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना फोन केला.
संभाजीराजेंचा जरांगे पाटलांना फोन
जरांगे पाटील, समाजाला तुम्ही महत्त्वाचे आहात. आपली प्रकृती खालावते आहे. आपण पाणी घ्यावं. मी विनंती करणार नाही. पण आपण तब्येतीची काळजी घ्यावी. आपण समाजासाठी फार मोठा लढा उभा केला आहे. तो आपण सगळे लढतोय. अशावेळी तुम्ही तब्येतीला जपलं पाहिजे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढली.
जरांगे पाटलांचा फडणवीसांविरोधात संताप
मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात संताप व्यक्त केला. मराठा आरक्षणाची चर्चा मीडियाच्या कॅमेरासमोर होत नसते, या फडणवीसांच्या दाव्यावर जरांगे म्हणाले, “त्यांच्या कानात बोळे घातले आहेत का? मग कालच म्हणाले होतो-चर्चेला या, मराठे तुम्हाला अडवणार नाहीत. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायला पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही”.