• Sat. Sep 21st, 2024
मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा, पत्रात म्हणाले, भावना तीव्र आहेत…!

हिंगोली : मराठा आरक्षणाची धग वाढली असून गावागावात आंदोलन पेटलंय. अशा परिस्थितीत राजकीय नेतेमंडळींवरही आता समाजाचा दबाव वाढलेला आहे. मराठा समाज गेली अनेक वर्ष तुमच्यामागे उभा राहिला. आता आरक्षणासाठी तुम्ही समाजाच्या मागे उभे राहा, अशी सक्त ताकीदच मराठा समाज बांधवांनी राजकीय नेत्यांना दिली आहे. याच दडपणातून हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं कळवलं आहे.

मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येत असल्याने राजकीय पुढारी त्रस्त आहेत. राजकीय नेते कुठेही गेले तरी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांची तर अधिक कोंडी झालीये. अशातच समाजासाठी लढणारा कार्यकर्ता असल्याचं सांगत आरक्षणाचा प्रश्न खूप दिवसांपासून प्रलंबित असल्याने आज खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं.

मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र असल्यानं मागे देखील दिल्ली येथे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारांची मराठा आरक्षण करिता विशेष बैठक बोलावली होती. यवतमाळ जिल्ह्यात ते असताना त्यांनी राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे

हेमंत पाटील राजीनामा देताना काय म्हणाले?

महाराष्ट्रात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना तीव्र असून, मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतक-यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

कोण आहेत हेमंत पाटील?

  • हेमंत पाटील हे कडवे शिवसैनिक आहेत, नांदेड हे त्यांचे कार्यक्षेत्र
  • नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केले
  • संधी मिळाल्यावर ते शिवसेनेकडून हिंगोलीचे खासदार झाले
  • सुरुवातीच्या काळात हेमंत पाटील हे राज ठाकरे यांच्या जवळचे होते
  • पण आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुढे संधी मिळेल, हे हेरून त्यांनी सेनेत राहणंच पसंत केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed