मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात धामणे येथे दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी आठ वर्षीय बालकावर जबर हल्ला केला. त्याला खाली पाडून या बालकावर अक्षरशः कुत्रे तुटून पडले. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहतानाही अंगाचा अक्षरशः थरकाप उडतो. धामणे गावात ८ वर्षीय बालकावर झडप घालून चावा घेतल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली आहे. तसेच दुर्दैवाने हा प्रकार बऱ्याच कालावधीपर्यंत सुरू होता. त्यामुळे या बालकाला अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतला आहे. हा बालक गंभीर जखमी झाल्याने संपूर्ण धामणे ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.
धामणे बौध्दवाडी येथील समर्थ प्रभाकर असे जखमी बालकाचे नाव आहे. आपल्या घरासमोर खेळत असताना गावातील दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याने ८ वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच भटक्या कुत्र्यांनी धामणे गावातील नागरिक, बालकांना चावल्याची घटना घडली होती असे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत. हा बालक गंभीर जखमी झाल्याने महाड ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला मुंबई जे जे हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. असे धामणे गावातील ग्रामस्थांनी सांगितले आहे.
रायगड जिल्ह्यात महाड येथील या घडलेल्या भयंकर घटनेनंतर रायगड आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही चिपळूण, खेड, रत्नागिरी, दापोली या शहरांमध्येही तसेच शहराजवळ असलेल्या गावांमध्येही भटक्या कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त वेळीच न केल्यास अशा घटना वारंवार घडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्हा प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांबाबत योग्य तो बंदोबस्त करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे. लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही कुत्रा चावल्याने अनेकांचे आजवर जीव गेले आहेत. तसेच अनेक जण जखमी झाल्याचे प्रकार हे घडले आहेत. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुचकामी ठरत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तसेच नगरपरिषद नगरपंचायती कार्यक्षेत्रात मोहीम राबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज आहे.