जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी येथेही मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू आहे. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपोषण मंडपात हजेरी लावली. आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. एवढेच नव्हे तर स्थानिक ओबीसी नेते, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीही उपोषणस्थळी येत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. सर्वपक्षीय मराठा नगरसेवकांनी मंडपात हजेरी लावली. राजकीय नेत्यांच्या या भेटीचे आंदोलक कार्यकर्त्यांनी स्वागतच केले आहे.
अहमदनगरच्या तहसील कार्यालयासमोर हे साखळी उपोषण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी निघालेल्या बस याच ठिकाणी अडविण्यात आल्या होत्या. आज तेथे वेगळे चित्र पहायला मिळाले. आमदार संग्राम जगताप यांच्यासह उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, मनोज कोतकर, संभाजी कदम, मदन आढाव, ज्ञानेश्वर काळे, विनीत पाऊलबुधे, निखील वारे, बाळासाहेब पवार, दीपाली बारस्कर, कुमार वाकळे, संपत बारस्कर, अजय बारस्कर नगरसेवक व विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण मंडपात येत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, यापुढे मनोज जरांगे पाटील जी दिशा दाखवितील. त्याप्रमाणे आपण लढा सुरू ठेवू. आपण सर्वांनीच जरांगे पाटील यांचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला नक्की यश येईल. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीबद्दल विचारले असताना सकल मराठा समाज आंदोलनाचे स्थानिक समन्वयक श्रीपाद दगडे म्हणाले, ‘जे नेते स्वत: होऊन आपल्याला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत, ते केवळ राजकीय पक्षाचे आहेत, म्हणून त्यांना विरोध केला जाऊ नये. आपण आजवर त्यांना जाब विचारला नाही, त्यांची भूमिका विचारली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका आपल्याशी पूरक असेल, तर त्यांना विरोध का करायचा? ते आपलेच बांधव आहेत.
केवळ त्यांना विरोध करून काय साध्य होणार आहे? त्यातही नगरसेवकांना विरोध करून काय होणार? उलट ते आपल्यासोबत आले तर आपली भूमिका वरच्या पातळीवरील नेत्यांपर्यंत त्यांच्या मार्फत पोहोचली जाऊ शकते. आंदोलनाची तीव्रता त्यातून वरिष्ठ पातळीवर लक्षात येऊ शकते. त्यामुळे आम्ही नगरसेवक आणि राजकीय नेत्यांना विरोध केला नाही. जे आमची भूमिका घेऊन येतील, त्यांचे स्वागत. मात्र, जे विरोधात भूमिका मांडतील, त्यांना मात्र येऊ दिले जाणार नाही,’ असेही दगडे यांनी सांगितले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते अड. प्रकाश आंबेडकर आज नगरला आले होते. आंबेडकर यांनी पूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नगरच्या मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावर आंबेडकर यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा भगवी टोपी आणि भगवी शॉल देऊन सत्कार करण्यात आला. वेळ मिळाल्यावर उपोषण मंडपात येऊन जाहीर पाठिंबा व्यक्त करण्याचे आश्वासन आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिले.