१७ लाखांची नव्याने भर
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी प्रारुप मतदार यादी नुकतीच जाहीर केली आहे. राज्यात नऊ कोटी आठ लाख ३२ हजार २६३ मतदार आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मतदारांची संख्या ७१.४१. टक्के इतकी आहे. त्यात १७ लाख तीन हजार १९३ मतदारांची नव्याने भर पडली आहे. ११ लाख ३५ हजार ८०४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये दुबार, मयत व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. एकूण मतदारांमध्ये चार कोटी ७३ लाख ६९ हजार ६६४ मतदार पुरुष, असून स्त्री मतदारांची संख्या चार कोटी ३४ लाख ५७ हजार ६७९ इतकी आहे. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या चार हजार ९२० इतकी आहे. त्यानुसार दर हजारी पुरुषांमागील स्त्रियांची संख्या ९१७ इतकी आहे. राज्यात एकूण १५ लाख ५६ हजार ३८३ मतदारांनी नाव, पत्ता फोटो आदी बदल केले आहेत.
मतदारसंख्येत पुण्याचा २५ टक्के वाटा
राज्यात एकूण वाढलेल्या पाच लाख ६७ हजार मतदारांपैकी पुणे जिल्ह्यात एक लाख २१ हजार ६६३ मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात नवमतदार तसेच स्थलांतरितांची संख्या वाढली आहे. नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणाच्या निमित्ताने आलेला वर्ग पुण्यात स्थायिक झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. राज्यात वाढलेल्या एकूण मतदारांच्या तुलनेत एकट्या पुणे जिल्ह्यात एक लाख २३ हजार मतदार वाढल्याने राज्यात वाढलेल्या मतदारसंख्येत पुण्याचा वाटा २५ टक्के एवढा आहे, अशीही माहिती पुढे आली.
स्त्री पुरुष मतदार दोन लाखांनी वाढले
राज्यात पाच जानेवारीला जाहीर झालेल्या अंतिम मतदारयादी नऊ कोटी दोन लाख ६४ हजार ८७४ इतके मतदार होते. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत सुमारे पाच लाख ६७ हजार ३८९ मतदारांची भर पडली आहे. जानेवारीच्या तुलनेत, ऑक्टोबरमधील मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या सुमारे अडीच लाखांनी वाढली आहे. तर महिला मतदारांची संख्या सव्वा दोन लाखांनी वाढली आहे.
राज्यात प्रारुप मतदार यादीचे काम सुरू झाल्यानंतर १८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबरपर्यंत आलेल्या विविध अर्जांवर कार्यवाही करता आली नाही. त्या दरम्यान, राज्यातून सुमारे चार लाख ८८ हजार ९८४ नवमतदारांचे अर्ज आले आहेत. तर दोन लाख दोन हजार १६६ मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. तसेच एक लाख ८७ हजार ७९० मतदारांनी दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत. या सुमारे पाच लाख अर्जावर कार्यवाही होणार असल्याने नवमतदारांची संख्या आणखी वाढणार आहे.
– श्रीकांत देशपांडे, राज्य मुख्य निवडणूक अधिकारी