• Sat. Sep 21st, 2024

लातूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, मराठा आंदोलकांनी रविकांत तुपकरांची बैठक उधळली, जागेवरुन उठवलं

लातूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, मराठा आंदोलकांनी रविकांत तुपकरांची बैठक उधळली, जागेवरुन उठवलं

लातूर: राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असून त्याची थेट झळ राजकीय नेत्यांना बसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तेव्हापासूनच मराठा संघटनांकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. हे लोण आता बहुतांश राज्यात पसरले असून दैनंदिन कामांसाठी आणि दौऱ्यांसाठी जाणारे मंत्री आणि नेत्यांना मराठा आंदोलकांच्या प्रखर रोषाचा थेट सामना करावा लागत आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून लातूर जिल्हयातील अनेक गावांत पुढाऱ्यांना गाव बंदी केली आहे तसेच पुढाऱ्यांना अडवून जाब विचारला जात आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अंबादास दानवे, प्रताप पाटील चिखलीकर, रोहित पवार, हसन मुश्रीफ, अजित पवार या नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा फटका बसला होता. त्यानंतर शनिवारी लातूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

पोटात पाण्याचा थेंबही नाही, डोळ्यांवर ग्लानी, बोलताना धाप; उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती कशी?

सकल मराठा समाजाने रविकांत तुपकर यांची लातूरच्या औसा रस्त्यावर असणाऱ्या विश्रामगृहातील बैठक उधळून लावली. त्यांना मराठा आरक्षणाच काय झालं म्हणून जाब विचारला. राजकीय पुढाऱ्यांना बंदी केली असताना तुम्ही लातूरमध्ये आलाच कसे, आंदोलकांनी तुपकर यांना विचारले. यावेळी रविकांत तुपकर विश्रामगृहातील एका सोफ्यावर बसले होते. मराठा आंदोलकांनी त्यांना घेरत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘रविकांत तुपकर चले जाव’, ‘रविकांत तुपकर परत जा, परत जा’ अशा घोषणा आंदोलक देत होते. रविकांत तुपकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक तुपकर यांच्यासमोर जोरजोरात घोषणा देत राहिले. अखेर रविकांत तुपकर यांनी सोफ्यावरुन उठत बैठक रद्द केली आणि ते माघारी फिरले.

Ajit Pawar: मराठा आंदोलकांच्या पवित्र्यानंतर अजितदादांचा महत्त्वाचा निर्णय, माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम रद्द

मराठा आंदोलकांनी शंभूराज देसाईंना पुरतं घेरलं, प्रश्नांची सरबत्ती

मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनलेला असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शनिवारी साताऱ्यात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. प्रश्नांची सरबत्ती करत मराठा आंदोलकांनी शंभूराज देसाईंना घेराव घातला. आजपर्यंत सरकारने फक्त आश्वासनांचा पाऊस पडला पण काम एक रुपयाचं केलेलं नाही, आरक्षण कधी देणार? एवढंच सांगा, असा सवाल करत मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed