• Mon. Nov 25th, 2024

    मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भन्नाट प्लॅन, भुयारी मेट्रोच्याही खाली वाहनांचा भूमिगत मार्ग

    मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भन्नाट प्लॅन, भुयारी मेट्रोच्याही खाली वाहनांचा भूमिगत मार्ग

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आरे ते कफ परेड दरम्यान तयार होणाऱ्या मेट्रो ३ या भुयारी मार्गिकेच्याही खालून वाहनांचा भूमिगत मार्ग तयार होणार आहे. जमिनीपासून तब्बल ४० मीटर खोलीवर हा मार्ग खणला जाणार आहे. प्रकल्पाच्या सल्लागारांनी सुचविलेल्या विविध आरेखन बदलांमुळे यासंबंधीच्या प्रकल्पखर्चात ६८६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हा प्रकल्प बांधला जाणार आहे.

    दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पश्चित द्रुतगती मार्गावरील ऑरेंज गेट ते पश्चिम किनारपट्टीवरील मरीन ड्राइव्हदरम्यान हा ९,२३९ मीटर लांबीचा भूमिगत मार्ग तयार केला जाणार आहे. यासंबंधीची निविदा प्रक्रिया राबविताना सल्लागाराच्या सल्ल्यानुसार एमएमआरडीएने कामाच्या एकूण स्वरूपात अनेक बदल केले. त्यामध्ये प्रामुख्याने मेट्रो ३ भुयारी मार्गाखालून हा मार्ग नेण्याचे ठरविण्यात आले. यामुळे मेट्रो ३सह रेल्वे आणि उंच इमारतीच्या पायाचा अडथळा टाळता येणार आहे. याखेरीज प्रकल्पाच्या डाव्या बाजूच्या मार्गरेषेच्या वळणाची त्रिज्या ही आधी निश्चित असलेल्या १५० मीटरऐवजी ३०० मीटरहून अधिक करण्यात आली आहे. त्रिज्या दुप्पट केल्याने खर्चात वाढ झाली आहे. मात्र यामुळे वाहनांचा वेग ताशी ८० किमी शक्य होईल, असे एमएमआरडीएने म्हटले आहे.

    पश्चिम रेल्वेवर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, शेकडो लोकल फेऱ्या रद्द ; प्रवाशांची प्रचंड गर्दी

    या प्रस्तावित मार्गाच्या डावीकडील भुयारी मार्गाची आधी सागरी किनारा मार्गास जुळणी होणार होती. मात्र आता त्याऐवजी हा मार्ग सागरी किनारा मार्गाखालून पुढे दक्षिण दिशेस नेण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्यामुळे सागरी किनारी मार्गास होणारी जुळणी टाळता येणे शक्य झाले व सागरी किनारा मार्गाची वाहतूक सुरक्षितपणे शक्य होणार आहे. या सुधारीत मार्गरेषेमुळे प्रकल्पाची लांबी ८,२५१ मीटरऐवजी ९,२३९ मीटर इतकी झाली असून, त्यामुळे कामाच्या स्वरूपात सुमारे ९८८ मीटर लांबीची वाढ झाली आहे. याखेरीज मरीन ड्राइव्ह येथे वाहतुकीच्या नियमनासाठी किनारा भागात सुमारे ३५० मीटर लांबीचा अतिरिक्त भराव टाकण्याचेदेखील प्रस्तावित आहे.

    सुधारित खर्च ८,७४२ रुपये

    या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ८,०५६ कोटी रुपये इतका होता. त्याच्या बांधकाम किंमतीत आकस्मिक बाबी, भूसंपादन आणि पुनर्वसन खर्च, दरवाढ किंमतीतील फरक, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार खर्च तसेच वस्तू सेवा कर इत्यादी बाबींचा अंतर्भाव होता. मात्र आता प्रकल्प स्वरूपात बदल व सुधारणा करण्यात आल्याने प्रकल्पाची सुधारित अंदाजित किंमत ८,७४२ कोटी रुपये इतकी झाली आहे. तसेच प्रकल्पाचा बांधकाम कालावधीही ४८ महिन्यांऐवजी ५४ महिने इतका करण्यात आला असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे. हेच प्रकल्पखर्चवाढीचे मुख्य कारण ठरले आहे.

    पृथ्वीराज चव्हाणांनी उद्घाटन केलं, ११ किमी मेट्रोला १२ वर्ष लागले, फडणवीसांनी झटक्यात विषय संपवला

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *