मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापला असून, गावागावांत बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे अनेक गावांत तर मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिले जाणार नसल्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावात राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी आल्यास त्यांना विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ग्रामीण भागात तापताना दिसत आहे.
बावनकुळे काय म्हणाले?
राज्यातील सर्वच पक्षांची भूमिका ही मराठा आरक्षण मिळावं हीच आहे. मात्र हे आरक्षण देताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी सर्व राजकीय पक्षांची स्पष्ट भूमिका आहे . त्यामुळे मराठा समाज हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जात असताना अशाप्रकारे गावात राजकीय पक्षांना बंदी घालणं हे अयोग्य असल्याचं बावनकुळे म्हणाले.
भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची पालघर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यापासून पालघर जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढला असून अनेकांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. याचविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले, “अंतर्गत नाराजी ही सर्वच पक्षांमध्ये असते. मी स्वतः यासंदर्भात नाराज पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करेन”
राजकीय नेत्यांना प्रवेश बंद, विकासकामांचे भूमिपूजन गावांतीलच ग्रामस्थांच्या हस्ते!
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत असल्याने राज्यातील अनेक तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांचे दौरे, कार्यक्रम बंद झाले आहेत. अनेक गावांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन गावांतीलच ग्रामस्थांच्या हस्ते केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.