या बद्दल अधिक माहिती अशी की, जिजाऊ नगर या भागात तीन हजार चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटवरुन न्यायालयात वाद सुरु आहे. गोरख शिंदे, रामलाल शिंदे, मच्छींद्र शिंदे यांच्यावतीने बन्सीलाल देवमन कुचे यांनी महापालिकेत तक्रार अर्ज दिला होता. या अर्जात म्हटले आहे की, त्या भुखंडावर न्यायालयाने शिवाजी वाडकर यांच्या विरुध्द बेकायदेशीर बांधकाम करु नये असे आदेश दिले आहेत , असे असताना वाडकर आरसीसीचा पाया तयार करुन त्यावर पत्र्याचे शेड उभारीत आहेत. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एक खोली आणि दोन शटरवर कारवाई करण्यात यावी . कुचे यांचा अर्ज प्राप्त होताच सहाय्यक आयुक्त श्रीधर टापरे यांनी गुरुवारी सकाळी कारवाई केली.
कारवाईसाठी ते पथकासह जिजाऊ नगरात दाखल झाले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने त्यांनी त्या ठिकाणचे बांधकाम पाडून टाकले. हे पथक माघारी फिरत असताना त्या ठिकाणी अचानक जमाव आला आणि त्यातील लोकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. श्रीधर टापरे, इमारत निरीक्षक संतोष गायकवाड यांना मारहाण केली. त्यानंतर जमावाने जेसीबी मशीन पेटवून दिली, त्यानंतर जमाव निघून गेला. अधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली त्यानंतर अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी जेसीबीची आग आटोक्यात आणली.
या बद्दल अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, जिजाऊ नगर भागात काही नागरिकांनी पालिकेच्या पथकावर हल्ला केला, जेसीबी मशीन जाळले, त्यामुळे पालिकेचे २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पालिकेचे पथक त्याच ठिकाणी कारवाईसाठी का गेले या बद्दल तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी केली जाईल.
Read Latest Maharashtra News And Marathi News